भिवंडीच्या सरवली एमआयडीसीत भीषण आग

। भिवंडी । प्रतिनिधी ।

भिवंडीच्या सरवली एमआयडीसीत भीषण आग लागल्याची घटना आज घडली आहे. भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी येथील मंगलमूर्ती डाईंग या कंपनीत भीषण आग लागली असून, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही घटना साधारण सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून, आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, कपड्यांचा साठा आणि रासायनिक पदार्थ असल्यामुळे आगीचा भडका वेगाने वाढला आणि कंपनीचे मोठे आवार काही क्षणातच आगीच्या विळख्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. आगीचे स्वरूप नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, तातडीने कल्याण, अंबरनाथ आणि ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न: अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या सध्या युद्धपातळीवर आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कंपनीच्या आतील भागातून धुराचे आणि आगीचे मोठे लोट बाहेर पडत असल्याने, कर्मचाऱ्यांना आत प्रवेश करणे कठीण झाले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे. मात्र, कंपनीतील कोट्यवधी रुपयांचे तयार झालेले कपडे, रंग आणि महागडी यंत्रसामग्री जळून खाक झाली असण्याची भीती व्यक्त होत आहे. ही मोठी वित्तहानी झाली असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version