। पालघर । प्रतिनिधी ।
आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक असलेल्या बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग लागल्याची घटना रविवारी (दि.29) घडली आहे. बोईसर-तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर के-6 मधील युके अॅरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या कारखान्यातील कामगारांना सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली हे कारण अजूनही अस्पष्ट आहे. हा केमिकलचा कारखाना असल्यामुळे आग झपाट्याने पसरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही आग इतकी भीषण होती की आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ लांबून दिसत होते.
बोईसर-तारापूर एमआयडीसीतील युके अॅरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला लागलेल्या आगीचा भडका वाढल्याने कंपनीशेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली. यात श्री केमिकल कंपनी देखील आगीच्या भक्षस्थानी पडली. दरम्यान, अग्निशमनदलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने आगीनंतर कामगारांनी पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार अडकले नसल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती आहे.