| अलिबाग | प्रतिनिधी |
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत दि. 8 ते 10 सप्टेंबरदरम्यान तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्ससाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, रामनिधी, खोपोली येथे करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन दि.9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, तहसीलदार कर्जत डॉ. धनंजय जाधव, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण तेजस्विनी गलांडे हे मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी जावळे यांनी प्रशिक्षणार्थीना संबोधित करताना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील 113 आदिवासी वाड्यांमध्ये सर्वसमावेशक योजना राबवून वाड्यांचा समृद्ध विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि मास्टर ट्रेनर्सना आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी स्वतः प्रत्येक तालुक्यातील दोन वाड्यांना भेट देऊन ग्राम विकास आराखड्यांचा आढावा घेणार असून, सर्व 113 वाड्यांचे आराखडे स्वतः तपासून शासनाकडे सादर करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये तालुकास्तरावरील 71 मास्टर ट्रेनर्सना जनजातीय गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्य व माहिती प्रदान करण्यात आली. प्रशिक्षणामध्ये विविध योजना, समुदाय संवाद, ग्रामविकास आराखडा निर्मिती आणि नेतृत्व क्षमता या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांच्या शाश्वत आणि समावेशी विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, या उपक्रमामुळे स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग वाढून, योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.







