मावळ लोकसभा निवडणुकीसाठीचे साहित्य मतदान केंद्रांवर

। कर्जत । प्रतिनिधी ।

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि.13) होणार्‍या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्रावर मतयंत्र व मतदानासाठी लागणारे साहित्य पोहचले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 5 हजार मतदार आहेत. त्यात एक लाख 53 हजार मतदार हे पुरुष तर एक लाख 51 हजार महिला मतदार आहेत. मतदारसंघात संपूर्ण कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट तसेच खोपोली नगरपरिषद आणि खालापूर नगरपंचायत यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 339 मतदार केंद्र असून मूळ मतदार केंद्रांची संख्या 335 आहे. मात्र, 1200 पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदार केंद्रांवर सर्व मतदारांना वेळेत मतदान करता यावे. यासाठी चार मतदान केंद्र वाढविण्यात आली आहेत. त्यात कर्जत तालुक्यात दोन ठिकाणी दुर्गम मतदान केंद्र असून तुंगी आणि ढाक या ठिकाणी ही केंद्र असणार आहेत. कळकराई आणि पेठ येथील मतदान केंद्र येथील मतदारांच्या परवानगीने दुर्गम भागातून खाली पायथ्याशी आणली आहेत.


मतदारसंघात यावेळी तब्बल 33 उमेदवार निवडणूक लढवीत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर यावेळी मतदान यंत्र तीन असणार आहेत. तीन इव्हीएम मशीन निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याने मतदान केंद्रावर देखील तीन मशीन ठेवण्याची यंत्रणा आणि व्हिव्हीपट मशीन ठेवण्यासाठी अतिरिक्त जागा करण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा वाढला असल्याने मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड झाल्यास तत्काळ दुसरे इव्हीएम मशीन उपलब्ध करून देता यावे. यासाठी मॅक्रो निरिक्षक तैनात असतील. मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर कर्मचारी वर्गावर काहिसा ताण या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केंद्र येथे असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सहा याप्रमाणे साधारण दोन हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य प्रश्‍न निर्माण झाल्यास मतदार यांना तत्काळ सुविधा देण्याची व्यवस्था आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आशा सेविका यांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. तर, गावाचे पोलीस पाटील उपस्थित असणार असून ते मतदान केंद्रावरील कर्मचार्‍यांना मदत करतील. मतदान दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघात अतिरिक्त पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे. होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी यांच्याकडून पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत. मतदान साहित्य व अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर नेण्यासाठी 50 एसटी बस, 19 मिनीबस व 32 जीपचा वापर करण्यात आल्याचे अजित नैराळे यांनी सांगितले.

प्रशासकीय भवन परिसरात असलेल्या पोलीस मैदानात प्रशस्त मंडप उभारण्यात आला असून तेथून सर्व मतदान केंद्राचे साहित्य यांचे वाटप करण्यात आले. या सर्व यंत्रणांवर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांचे जातीने लक्ष असून कर्जतचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी सहकार्य करीत आहेत.

मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या स्लिप वाटण्यात आल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात कर्जत तालुक्यात काही तर प्रशासकीय भवनाला लागून असलेल्या विठ्ठलनगर परिसरात अद्याप स्लिप पोहोचल्या नसल्याने मतदानाच्या टक्केवारीवर नक्की परिणाम होऊ शकतो. कारण मतदारांना स्लीप न मिळाल्याने ते मतदानासाठी किती उत्साही असतील हा हो संशोधनाचा विषय असेल, असे मत अरुण निघोजकर या मतदाराने बोलून दाखविले आहे.
Exit mobile version