आशिर्वाद फाऊंडेशनची ‘मॅथ्स प्रीमियर लीग’; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी नवोपक्रम
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
गणित हे केवळ अभ्यासाचे विषय न राहता आनंददायी, सोपे आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी श्री. मोहनलाल सोनी विद्यालय बोर्ली पंचतन येथे आशिर्वाद फाऊंडेशनतर्फे ‘मॅथ्स प्रीमियर लीग’च्या गणित विषयी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या मॅथ्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यातील जनता शिक्षण संस्था संचलित श्री. मो. सो. विद्यालय बोर्ली, आदगाव, भरडखोल, मेंडदी अशा 5 शाळांमधील इयत्ता सातवी ते नववीच्या शंभरहून जास्त विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.
गणित हे केवळ अभ्यासाचे विषय न राहता आनंददायी, सोपे आणि आत्मविश्वास वाढवणारे कसे बनू शकते, याचा अनुभव यावेळेस विद्यार्थ्यांना देण्यात आला. स्पर्धेचे स्वरूप हे खेळाच्या धर्तीवर ठेवण्यात आले होते, प्रश्नमंजुषा, गणितीय कोडी, वेग व अचूकतेवर आधारित फेऱ्या अशा विविध टप्प्यांतून ही लीग पार पडण्यात आली. सर्व शाळांचे एकाहुन अधिक संघ बनवण्यात आले होते आणि विजेत्या संघांच्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. आशीर्वाद फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश चव्हाण व फाउंडेशनच्या सदस्यांमार्फत उपस्थित शिक्षकांच्या सहकार्याने आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी जे नवोपक्रम कार्यान्वित केले जात आहेत हे आपले कार्य कौतुकास्पद तद्वतच प्रेरणादायी आहे. आजची गणितातील प्रीमियर लीग ही संकल्पना खूप छान झाली. त्यातून गणिताबद्दल असलेली भीती दूर होऊन विद्यार्थ्यांची रुची वाढेल स्पर्धा असल्याने मुलांनी तसेच शिक्षकांनी देखील हिरीरीने भाग घेतल्याचे जाणवले असे संदीप पाटील याप्रसंगी म्हणाले. आशिर्वाद फाऊंडेशनच्या या नावीन्य पूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल, तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माणगाव तालुक्यातील प्रा. रणपिसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी श्रीकांत तोडणकर, संदीप पाटील, प्रा. यळमंते, अमित पाटील, प्रशांत पाटील, तेजस कांबळे, नेहा शहा, वेदिका पिलणकर, श्रुष्टी अपराध तसेच आशिर्वाद फॉऊंडेशनचे अध्यक्ष राजेश चव्हाण, निखिल रिळकर, अक्षय पयेर, अनिकेत खोत, निशांत रिळकर यांनी विशेष सहकार्य केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे पालकवर्गातून स्वागत करण्यात आले. तसेच उपक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या.
स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणे
विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची भीती दूर करून त्यांच्यात गणिताची आवड निर्माण करणे, गणिताचा पाया भक्कम करणे तसेच विचारशक्ती, तार्किक क्षमता व स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणे हा या मागचा हेतू आहे. शिक्षणासोबतच आनंददायी शिकण्याची संस्कृती रुजवणे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे असा आहे. याच बरोबर अशा स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे.







