नवीन रुग्णवाहिकेची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
मावळचे पहिले खासदार स्व. बाबर यांनी माथेरानसाठी टाटा सुमो प्रकारातील रुग्णवाहिका दिली होती. माथेरानमधील रस्ते मातीचे असल्याने ती रुग्णवाहिका फारकाळ टिकली नाही. त्यामुळे त्यानंतर खा. श्रीरंग बारणे यांनी उपलब्ध करून दिली होती. मात्र, तीदेखील जुनी झाली असल्याने ती नेहमीच बंद पडते. टाटा सुमो ही रुग्णवाहिका माथेरान पालिका रुग्णालयाच्या बाजूला भंगारात पडली आहे.
माथेरान या वाहनांना बंदी असलेल्या शहरात केवळ रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणांच्या वाहनांना परवानगी आहे. येथे दोन रुग्णवाहिका असून, एक 108 ही सरकारी असून, दुसरी नगरपालिकेच्या माध्यमातून चालवली जाते. परंतु त्यातील 108 क्रमांक असलेली आरोग्य विभागाची रुग्णवाहिका ही कायमस्वरूपी माथेरानमध्ये उपस्थित नसते. त्यामुळे येथील जनतेला केवळ एका रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते. पटाटा सुमो ही रुग्णवाहिका माथेरान पालिका रुग्णालयाच्या बाजूला भंगारात पडली आहे.
माथेरानमधील डोंगराळ भाग आणि रस्त्याची कमतरता यामुळे रुग्णवाहिका ही अत्यावश्यक बाब आहे. त्यात माथेरानमध्ये वर्षाकाठी किमान 15 लाख पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. ते लक्षात घेता एकमेव रुग्णवाहिकेवर शासकीय यंत्रणेने अवलंबून राहता कामा नये, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी स्थानिक आ. महेंद्र थोरवे यांच्याकडे माथेरानसाठी असलेली दोन रुग्णवाहिकांची अट शिथिल करून तीन रुग्णवाहिकांना शासनाने परवानगी द्यावी आणि नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. तर माथेरानसाठी माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानकडून रुग्णवाहिका देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी पालिकेने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी आणून जोशी युवा प्रतिष्ठानला परवानगी द्यावी, अशी मागणी दिगंबर चंदने यांनी पालिकेकडे केली आहे.