अवघे माथेरान शहर झाले शिवमय!

। माथेरान । वार्ताहर ।

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर माथेरान शहरामध्ये पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्सव आनंदात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजीचा अखंड जयघोष आणि शोभा यात्रेचा उत्साह अश्या चैतन्यमय वातावरणात शुकवारी (दि.10) मे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पारंपरिक शिवजयंती उत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रतिमा पूजन, ढोल ताशांचा गजर, चित्तथरारक मर्दानी खेळ व स्थानिक महिलांचे लेझीम पथक अशा विविध उपक्रमांमुळे वातावरण शिवमय झाले होते.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एक श्रद्धास्थान आणि स्फूर्तीस्थान असून माथेरान मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची येथे अनेक दशकांची परंपरा आहे. येथील शिवसैनिकांच्या पुढाकाराने आणि समस्त माथेरानकरांच्या सहकार्याने शिवजयंती उत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. सायंकाळी 7 वाजता माथेराननगरीत समस्त माथेरानवासीयांच्या उपस्थितीत भव्यदिव्य अशी शिवप्रतिमेची शिवशाही थाटात ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करीत मुख्य बाजार पेठेतून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महिला तलवारबाजी, महिला लेझीम पथक व दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. माथेरान नगरीत असलेल्या पर्यटकांनी सुद्धा या शिवजयंती उत्सवात सामील होऊन या सुंदर सोहळ्याचा आनंद घेतला.

Exit mobile version