। नेरळ । प्रतिनिधी ।
राज्यात उन्हाने अंगाची लाहीलाही होत असून पारा चाळिशीपार गेला आहे. जगातील नंदनवन समजले जाणार्या काश्मीरमध्येदेखील तापमान 32 अंशांवर पोहचले आहे. दक्षिण भारतात तर पारा आणखी वर गेला असून प्रत्येकाला थंड हवेची झुळूक हवी आहे. मात्र, गुलाबी थंडीसाठी ओळखल्या जाणार्या माथेरानमध्ये सध्या पारा घसरला आहे. जंगलाने व्यापून टाकलेल्या माथेरानमध्ये पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील प्रवेश बनल्याने झाडे तोडीवर बंदी आहे. त्यामुळे निसर्ग संपदा अनाई वनराई आणखी मजबूत झाली असून माथेरानमधील गारवा वाढण्यास मदत होत आहे. माथेरानच्या आजूबाजूच्या शहरात कडक उन्हामुळे घामाच्या धारांनी सर्व व्याकूळ झाले आहेत. त्यावेळी माथेरानसारख्या ठिकाणी उन्हाळ्यात माथेरानमध्ये रात्रीच्या वेळी चांगलाच गारवा जाणवत आहे. रात्री 12 ते पहाटे 5 या कालावधीत माथेरानचा पारा 20 अंश एवढा खाली उतरत आहे. त्यामुळे ही बाग माथेरानच्या पर्यटन वाढीसाठी तसेच उन्हाळी पर्यटन हंगामासाठी आशादायी ठरत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.