माथेरानला भरली पक्ष्यांची शाळा

। नेरळ । प्रतिनिधी ।
सर्व पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असलेल्या माथेरानमध्ये सध्या तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे. 1 जूनपासून बरसत असलेल्या पावसाने 21 दिवसात 1 हजार मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असून यावर्षीचा उच्चांक मनाला जात आहे. लॉकडाऊन असल्यामुळे पर्यटक नसल्यामुळे निरव शांततेमुळे पावसाळी खंड्या, कूटरुक, गोगी, कुकटकुंभा असे विविध पक्षी पावसात ओरडताना दिसत आहेत. काही पक्षी शिटी प्रमाणे ओरडत आहेत. त्यामुळे माथेरानच्या निसर्गात पक्ष्यांची जत्रा पहावयास मिळत आहे.

माथेरानला सरासरी 3050 इतका पाऊस पडतो. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा वेग मंदावला होता.12 जूनपर्यंत पाऊस 500 मिली मीटर पाऊसाची नोंद झाली होती. मात्र 13 जूनपासून पावसाने जोरदार मुसंडी मारली. 16 जूनपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. चार दिवस सतत पडलेल्या पावसामुळे 21 जूनपर्यंत 1102 इतकी पावसाची नोंद झाली.

माथेरानकरांना मुसळधार पाऊस नवीन नाही. मात्र या चार दिवसात सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे माथेरानकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. येथील शारलोट तलाव तुडुंब भरून वाहत आहे.

माथेरानमध्ये जोरदार पाऊस असतोच. 1980 पासून ते 1995 पर्यंत पाऊस असायचा तसा पाऊस माथेरानमध्ये बरसत आहे. गोगी पक्षी ओरडणे म्हणजे जास्त पाऊस पडण्याचे संकेत. या पक्ष्यांमुळे येथील निसर्ग खुलून दिसत आहे. पक्षी अभ्यासकांसाठी जून आणि जुलै महिने पर्वणीच ठरणार आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पर्यटकांना पक्ष्यांची जत्रा अनुभवण्यास मिळणार आहे.
पवन गडवीर-अध्यक्ष, निसर्ग मित्र संस्था

Exit mobile version