निपक्षपणे कामे केल्यास माथेरान प्रगतीपथावर

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान पर्यटन नगरीला येण्यासाठी नेरळहुन एकमेव मार्ग उपलब्ध आहे. या मार्गेच माथेरानला सर्व वाहतूक व पर्यटक येत असतात. पण या मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या गाव, वाड्या आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी माथेरानला वेठीस धरत असून त्याचा प्रत्यय नुकताच माथेरानकरांना आला. येथील रस्त्याच्या बाजूला वसलेल्या गावांना शासन रस्ता बनवून देत नसल्याने या गावकर्‍यांनी चक्क माथेरानला येणारा मार्ग रोखून धरल्याने विकेंडला माथेरानला आलेल्या पर्यटकांना असुविधेस सामोरे जावे लागले. हा रस्ता रोको चक्क एक तास करण्यात आला. त्यामुळे घाटामध्ये लांबच्या लांब वाहनांच्या रांगा दिसून आल्या. असेच काही दिवसांपूर्वी माथेरानला येणारे पाणी पुरवठा तोडण्याची धमकी देताना येथील जुम्मा पट्टी येथील पंपिंग स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले होते.

माथेरानला येणारा हा एकमेव मार्ग असल्याने हा मार्ग रोखून धरल्यास आपल्या मागण्या मान्य होत असल्याचे लक्षात आल्यानंतर असे प्रकार सुरू झाले. पण त्याचा फटका मात्र माथेरानमधील स्थानिक व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळेच माथेरानसाठी पर्यायी मार्ग असावा अशी मागणी होत आहे. इथे दिग्गज राजकारणी मंडळी कार्यरत आहेत. परंतु यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि श्रेयवादा मुळेच हे सुंदर गाव अधोगतीला जात आहे. गलिच्छ राजकारणापायी होणार्‍या महत्वाकांक्षी कामांना खोडा घालण्यात या गावातील राजकीय मंडळी अग्रेसर आहेत. मागील काळात सुध्दा एक पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून फिनिक्युलर रेल्वे मार्गाची सुविधा उपलब्ध होणार होती. त्यास सुध्दा तालुक्यातील जबाबदार व्यक्तींनी या महत्वकांक्षी प्रकल्पास केवळ वोट बँकेच्या आधारावर विरोध केल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

श्रेयवादाच्या लढाईत गावाचा विकास खुंटला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. गावाच्या उन्नतीसाठी आणि भावी पिढीच्या प्रगतीसाठी सर्वपक्षीयांचा एकोपा यापुढेही जर कायम नसेल तर परिसरातील लोकांची संख्या अगोदरच वाढलेली आहेच हे डोईजड होण्याआधीच एकसंध राहून गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे. इथला भुमिपुत्र आजही कर्जाच्या खाईत गुरफटत गेला आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या भावी आयुष्याला कलाटणी देण्यासाठी राजकारण्यांनी निपक्षपणे कामे केल्यास माथेरान निश्‍चितच प्रगतीपथावर जाईल यात तिळमात्र शंका नाही असा स्थानिकांना ठाम विश्‍वास आहे.

Exit mobile version