| माथेरान | वार्ताहर |
यंदाच्या वर्षी पावसाचे आगमन लवकर झाल्यामुळे उन्हाच्या झळा कमी झाल्या असून सुखद गारव्यांच्या दिवसांना सुरूवात झाली आहे. अवघ्या काही दिवसांतच डोंगर माळरान हिरवेगार होऊ लागले आहेत. त्याचबरोबर फेसाळणारे धबधबे देखील वाहू लागले आहेत. अशा ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. मुंबईपासून जवळ असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ देखील त्यापैकीच एक ठिकाण आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असून पावसाळ्यात येथील नयनरम्य दृक्ष जणू स्वर्गाचा भास करून देत असतात. त्यामुळे, काय तो इथला पाऊस, काय ती थंड हवा, काय ते धबधबे, असे म्हणत निसर्गप्रेमी पर्यटक आपला मोर्चा माथेरानकडे वळवताना दिसत आहेत.
अनेकांना उन्हाळ्यात कामाच्या व व्यवसायाच्या दगदगीतून उसंत मिळत नाही. त्यामुळे निदान पावसाळ्यात तरी वेळात वेळ काढून मनाला आलेली मरगळ, शिणता घालवण्यासाठी नैसर्गिक विविधतेने नटलेल्या ठिकाणी पर्यटांची पंसंती असते. परंतु, जिल्ह्यातील अनेक धबधब्यांवर मद्यधुंद युवकांचा गदारोळ असतो. अनेक नदी नाल्यांवर अतिउत्साही तरुणांना पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताच्या घडत असतात. या घटनांना आळा बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाने अनेक ठिकाणी बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होत आहे. मात्र, मुंबईपासून जवळचेच रमणीय ठिकाण असलेल्या माथेरानला अधिकाधिक पसंती दिली जात आहे. त्या ठिकाणी अधिकाधिक सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आपले निसर्गप्रेम वर्षाऋतूत पण अबाधित ठेवण्यासाठी बहुसंख्य पर्यटक हे माथेरान पर्यटनस्थळाला आपली पहिली पसंती देतात.
माथेरानमध्ये पायी चालताना घाट रस्त्यात लागणाऱ्या धबधब्यांवर मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. माथेरान शहरात दाखल झाल्यावर पदभ्रमण करताना येथील पावसाच्या गारेगार सरी अंगावर घेण्याचा आंनद वेगळाच असतो. येथील पॉईंटवरील निसर्गरम्य स्थळे न्याहाळत असताना दाट धुक्यातून समोरची अलौकिक, अद्भुत व अवर्णनीय दृश्ये डोळ्यात साठवून आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सुद्धा पर्यटकांची एकप्रकारे धांदल उडत असते. त्याचबरोबर धबधब्याखाली अंघोळ करण्याची हौस देखील येथील शारलोट तलावाच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली पुर्ण करत असतात. तसेच, पावसाळ्यात येथील संपुर्ण परिसर धुक्यात लपला जातो, त्यामुळे माथेरानचे सौंदर्य अनेकपटीने वाढते. अशा विविध नैसर्गिक दृश्यांनी वेढलेले हे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे पावसाने यंदाच्या वर्षी लवकर आगमन केल्याने पावसाळी वर्षा सहलीसाठी माथेरान पर्यटनस्थळ हे बेस्ट असल्याचे बोलले जात आहे.
वर्षा सहलीसाठी माथेरानला पसंती
