| नेरळ | प्रतिनिधी |
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम फुलला आहे. वातावरणात प्रचंड उष्मा असल्याने थंड हवेचे ठिकाणाला सर्व प्राधान्य देत असतात. त्यामुळे सध्या माथेरान पर्यटकांनी गजबजलेले असून, व्यावसायिक आनंदी आहेत. 15 जून पर्यंत पर्यटन हंगाम असाच चालावा अशी अपेक्षा व्यावसायिक करीत आहेत.
माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटक हे येथील प्रामुख्याने लाल मातीच्या रस्त्यावरून चालण्यासाठी पर्यटक येत असतात. माथेरान मध्ये व्यापार उदीम वाढला असून, पर्यटकांच्या रेलचेल मधून व्यवसाय वाढला असल्याने पॉईंटवर व्यवसाय करणारे माथेरानमधील स्टॉल धारक खुश आहेत. मे आणि अर्धा जून महिना पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जातो. माथेरान या जंगलाने वेढलेल्या पर्यटनस्थळी पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे व्यापार उदीम वाढला आहे.
माथेरान सारख्या मुंबई पासून जवळ असलेल्या पर्यटनस्थळी येणे वाहतुकीच्या मुबलक साधनांमुळे सहज शक्य आहे. दुसरीकडे शहरात वाहतुकीसाठी पर्यावरण पुरक ई- रिक्षा उपलब्ध असल्याने पर्यटकांना शहरात जाण्यासाठी चालायला लागत नाही. त्यात ई- रिक्षामुळे वृद्ध आणि महिला पर्यटक यांच्यासाठी हे पर्यटनस्थळ हाकेचे अंतरावर आले आहे. सध्या कडक उन्हामुळे माथेरानमध्ये पर्यटकांचे लोंढे वाढले आहेत. माथेरान मध्ये सर्वत्र पर्यटकांची गर्दी दिसून येत असून, माथेरान मधील हा पर्यटन हंगाम वर्षातील सर्वात मोठा पर्यटन हंगाम समजला जातो. त्यामुळे माथेरान मधील सर्व प्रेक्षणीय स्थळावर पर्यटक ठराविक वेळी गर्दी करून असतात.
माथेरान मधून दिसणारे सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. माथेरान मधील अशी स्थळे सध्या उन्हाळी पर्यटनासाठी गजबजलेली आहेत. दरम्यान, माथेरान मध्ये सनसेट पॉईंट, लुईझा पॉईंट आदी ठिकाणी पर्यटक मावळत्याचे सूर्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे. माथेरानच्या डोंगरावरून दिसणारा सकाळचा सूर्योदय पाहण्यासाठी प्रामुख्याने पॅनोरमा पॉईंट येथे पहाटेच्या वेळी पर्यटक तेथे जाऊन सूर्याचे दर्शन घेत असतात. माथेरान शहर आणि पॅनोरमा पॉईंट हे दोन वेगवेगळ्या टोकावर असताना देखील आपल्या हॉटेल मधून निघून पॅनोरमा पॉईंट गाठतात. त्यामुळे पर्यटक यांच्या पॅनोरमा पॉईंट वर जाण्याने सर्वाधिक व्यवसाय हा माथेरान मधील घोडे मालकांचा होतो. त्यामुळे माथेरान मधील घोडे मालक हे देखील आदल्या रात्री पर्यटकांना पॅनोरमा पॉईंट बद्दल माहिती देऊन घोड्यांची आगाऊ नोंदणी करून पर्यटकांना सेवा देत असतात. तर माथेरान मधील सूर्यास्त पाहण्याचा आनंद हा विशेष असतो.
माथेरान मध्ये सूर्यस्त पाहण्याची अनेक ठिकाणे आहेत, मात्र त्यात सूर्यास्त पॉईंट आणि लुईझ पॉईंट ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. त्याचवेळी माथेरान मधील वन ट्री हिल तसेच एको पॉईंट येथे देखील पर्यटक मावळत्या सूर्याची किरण लुप्त होत असताना ती किरणे आणि सूर्य देव पाहण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यात माथेरानमध्ये दिसणारा सूर्यास्त हा आकाराने मोठा असतो अशी भावना असल्याने पर्यटक प्रामुख्याने सूर्यास्त न्याहाळण्यासाठी माथेरान मध्ये येत असतात.
माथेरान मधील सनसेट पॉईंट आणि लुईझा पॉईंट तसेच यांच्या समोर पश्चिमेकडे डोंगर आहे आणि काही भागातून अरबी समुद्र देखील नजरेस पडत असतो. त्यामुळे त्या- त्या ठिकाणी सूर्यास्त न्याहाळण्याचा मजा काही और असते. आणि त्यामुळे माथेरान मध्ये आलेले पर्यटक सध्या माथेरान च्या पश्चिम दिशेकडे असलेल्या प्रेक्षणीय स्थळी जाऊन सनसेट न्याहाळत असतात.







