औषधी वनस्पती भरपूर प्रमाणात; दुर्मिळ पक्षांची किलबिलाट
| माथेरान | वार्ताहर |
माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटून जातात. मात्र, माथेरानच्या निसर्गामध्ये पर्यटना व्यतिरिक्त लपलेले जैवविविधतेचे पैलू माथेरानकरांसह पर्यटकांना देखील माहिती नाही. त्यामुळे माथेरानच्या डोंगरमाथ्यावरील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधता असणे खूप गरजेचे असून, माथेरान हे जैवविविधतेने समृद्ध असे पर्यटनस्थळ आहे.
माथेरानचे पर्यटनस्थळावरील जंगल हे 700 हेक्टर मध्ये पसरलेले आहे. त्यातील 300 हेक्टर परिसर माथ्यावर असलेले रान आणि 400 हेक्टर माथेरानच्या खालचा परिसर असून येथे अनेक प्रकारच्या किडे, मुंग्यापासून अनेक पक्षी तसेच प्राणी आणि अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. ऋतूनुसार येथे जैवविविधतेचे प्रकार पहावयास मिळतात. पावसाळ्यात गोगलगाय, सुरवंट, जळू, गांडूळ, वेगवेगळ्या प्रजातीचे साप त्याच बरोबर पावसाळ्यातील वातावरणामुळे वर्षातून एकदा येथे वास्तव्यास येणारे पक्षी पाहवयास मिळतात. हिवाळी मोसमात याठिकाणी फुलपाखरांच्या विविध प्रजाती दिसतात. तर, इतरत्र उडणारे चतुर सुद्धा दिसतात. येथील जंगलात फिरावयास गेल्यास कीटकांच्या वेगवेगळ्या प्रजाती दिसतात. त्यामध्ये काही दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. वातावरणानुसार बागडणाऱ्या दुर्मिळ पक्षांचे दर्शनही घडते.
माथेरानचे घनदाट जंगल असल्यामुळे याठिकणी औषधी वनस्पती सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. आजही जुनी जाणकार मंडळी औषधी वनस्पतींचा वापर करताना दिसतात. माथेरान मधील निसर्गमित्र संस्थेच्या अभ्यासानुसार वीस वर्षांपूर्वी जे सजीव दिसत होते तेच सजीव आजही दिसत आहेत. त्यामुळे येथे कोणतीही प्रजाती लोप पावली नसल्याचे संस्थेचे अध्यक्ष पवन गडवीर यांचे म्हणणे आहे.
जैवविविधता राखणे आवश्यक
हवेची गुणवत्ता राखणे, जलशुद्धीकरण करणे, परागण वाढविणे, क्षरणाला प्रतिबंध करणे, मृदा सुपीक करणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे इत्यादी बाबी जैवविविधतेमुळे साध्य होतात. लोकसंख्यावाढ, निर्वनीकरण, प्रदूषण, जागतिक हवामान बदल इत्यादी मानवी कृतींशी संबंधित कारणांमुळे जैवविविधतेचे प्रमाण घटत आहे. असे जरी असले तरी माथेरानच्या निसर्गातील जैवविविधता आजही टिकून आहे.
माथेरानचे जंगल फार मोठे आहे. असे असले तरी वन विभागाच्या माध्यमातून सर्व कर्मचारी जंगल भ्रमण करत असतात. शिकार करण्याचे प्रमाण नगण्य झाले असून वनसंपत्ती, पक्षी, प्राणी याची संख्या वाढलेली दिसत आहे. घुबड, स्वर्गीय नर्तकहे पक्षी, रान डुक्कर, भेकर तसेच राज्य प्राणी शेकरू यांचे प्रमाण वाढले असून हे सर्व दृष्टीस पडतात.
उमेश जंगम,
वन विभाग अधिकारी







