अवघे 116 वयोमान माझे

 नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनमध्ये अनेक स्थित्यंतरे

| नेरळ | प्रतिनिधी |

मुंबई मधील पारसी व्यापारी आदमजी पिरभोय यांनी 1907 मध्ये नेरळ येथून माथेरान जाण्यासाठी नारगेज ट्रॅक बनवून मिनीट्रेन सुरू केली. मिनी ट्रेन सुरु झाली त्या दिवसाला 116 वर्षे पूर्ण झाली असून नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालविल्या गेलेल्या पहिल्या मिनीट्रेनला रविवारी (दि.16) 116 वर्षे झाली असून या काळात या मिनीट्रेन ने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत.

1857 मध्ये ठाण्याचे कलेक्टर ह्यूज मेलेट यांनी शोध लावल्यावर रामबाग मार्गे माथेरान मध्ये ब्रिटिश अधिकारी येऊ लागले. थंड हवेचे ठिकाण म्हणून शोधलेल्या या ठिकाणी नंतरच्या काळात सरकारी कचेर्‍या सुरू झाल्या.1905 मध्ये माथेरान गिरीस्थान नगर परिषद, पोस्ट ऑफिस, टेलिग्राम केंद्र ही ब्रिटिशांची देणं होत. त्या काळी मुंबई येथून पनवेल, उलवे, चौक असे पुढे रामबाग मार्गे चालत आणि घोड्यावर किंवा डोलीत बसून माथेरानला ब्रिटिश अधिकारी आणि मुंबई मधील धनिक समजले जाणारे पारसी लोक यायचे. पुढे सन 1854 मध्ये मुंबई पुणे या मार्गांवर रेल्वे चालू झाली आणि 1856 ती ट्रेन नेरळ अशी खोपोली पर्यंत पोहचली. त्यामुळे नेरळ येथे रेल्वे ट्रेन असल्याने नेरळ येथून माथेरान असा प्रवास सुरू झाला होता. घोडा किंवा डोलीत बसून माथेरानला जाण्याचा मार्ग 1857 मध्ये विकसित करण्यात आला होता. सन 1900 च्या दरम्यान मुंबईचे नगरपाल असलेले सर आदमजी पिरभाय आणि त्यांचा मुलगा हुसेन अब्दुल पिरभाय हे माथेरान जाण्यासाठी नेरळ येथे आले असता अंधार झाला होता आणि त्यामुळे त्यांना माथेरान येथे जाण्यासाठी डोली उपलब्ध झाली नाही. तेंव्हा पीरभोय पिता-पुत्रानी माथेरान येथे जाईन तर ट्रेन घेऊनच जाईन असा निर्णय घेतला आणि आदमजी पीरभोय आणि त्यांचा इंजिनियर मुलगा अब्दुल हुसेन पिरभोय यांनी नेरळ ते माथेरान या अत्यंत अवघड घाटातून रेल्वे नेण्यासाठी 1901 मध्ये सुरवात केली आणि 15 एप्रिल 1907 रोजी नेरळ माथेरान या 21 किलोमीटर नेरोगेज मार्गांवर नेरळ माथेरान नेरळ अशी मिनीट्रेन सेवा सुरू झाली. रेल्वेच्या या कामाकरिता एकुण त्यांनी 16 लाख रुपये खर्च स्वतः खर्च करून मार्ग उभारला आणि मिनी ट्रेन सेवा सुरू केली.

15 एप्रिल 1907 रोजी माथेरान नेरळ माथेरान या नेरोगेज रेल्वे मार्गांवर पहिली मिनी ट्रेन धावली. त्या घटनेला आज 116 वर्षे पूर्ण झाली असून मिनी ट्रेन 116 वर्षाची झाली आहेत. मात्र त्या काळात मिनी ट्रेनने अनेक स्थित्यंतरे पाहिली असून 1972 मध्ये तीन वर्षे चाललेल्या रेल्वे संपात ही ट्रेन बंद होती. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी माथेरान नेरळ घाट रस्ता श्रमदान करून तयार केला आणि आज हाच एकमेव रस्ता माथेरान घाटरस्ता म्हणून ओळखला जातो. मात्र पूर्वी वाफेच्या इंजिन वर चालवली जाणारी मिनी ट्रेन आता डिझेल वर चालवली जात आहे. तर पूर्वी मिनी ट्रेन च्या प्रवासात दोन बोगी मध्ये ब्रेक पोर्टर असायचे आणि त्यांच्या माध्यमातून ब्रेक लागले जायचे. आज एअर ब्रेक सेवा सुरू झाली असून वातानुकित सेवा देखील मिनी ट्रेन मध्ये मिळत असून विस्टा डोम प्रवासी डब्बा देखील प्रवाशांच्या सेवेत आहे. दूसरीकडे या गाडीमध्ये अनेक बदल करण्यात आले असून मिनी ट्रेन जागतिक वारसा म्हणून नामांकन मिळविण्यासाठी सज्ज आहे. 116 वर्षाची होऊन देखील मिनी ट्रेन मोठ्या दिमाखात प्रवाशांना सेवा देत आहे.

Exit mobile version