पीएमसीकडून कामात चालढकल
| नेरळ । वार्ताहर ।
माथेरान शहरात राज्य सरकारच्या माध्यमातून मलनिःसारण प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून 47 कोटींचा निधी मंजूर असून या प्रकल्पासाठी माथेरान नगरपरिषदेने सल्लागार कंपनी नेमली आहे. तब्बल एक कोटी रुपये या सल्लागार कंपनीला माथेरान पालिका देणार आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या कामात सल्लागार कंपनीकडून चालढकल केली जात असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे अशा कंपनीला एक कोटींचा निधी कशाला द्यायचा, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
शासनाच्या नगरविकास विभाग यांच्याकडून माथेरान शहरातील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी माथेरान पालिकेला 47 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाच्या 2.23 टक्के रक्कम असलेल्या निधीमधून सल्लगार कंपनी काम करीत आहे. सल्लगार कंपनी म्हणून हा ठेका वॉटर गेट कॅन्सल्टसी यांनी मिळविला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत सल्लागार कंपनी कार्यरत राहणार आहे. त्यासाठी या सल्लागार कंपनीला एक कोटींचा निधी मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम करून घेण्यासाठी अभियंता यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्याचे आणि प्रकल्पाचे काम नियमानुसार होत आहेत काय? यावर लक्ष ठेवण्याचे काम सल्लागार कंपनी करणार आहे. मात्र माथेरानमधील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम केले जात असताना मागील दोन महिन्यात प्रकल्पाचे काम किती पूर्ण झाले हे सल्लागार कंपनीला सांगता आले नाही.
शहरातील पिसारनाथ मार्केट येथे पाईपलाईनचे काम करीत असताना त्या ठिकाणी सल्लागार कंपनीचे कोणीही अभियंते उपस्थित नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे माथेरानमधील महत्वाच्या प्रकल्पासाठी सल्लागार कंपनी म्हणून नेमण्यात आलेल्या कंपनीचे अभियंते उपस्थित राहत नाहीत असे दिसून आले आहे. असा आरोप माथेरान व्यापारी फेडरेशनचे कार्यकर्ते गिरीश पवार, राजेश चौधरी यांनी केला आहे. दोन किलोमीटर पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्या सर्व ठिकाणी कुठेही खोदकाम झाल्यावर सिमेंटने पीसीसी केलेली नाही. याबद्दल देखील स्थानिक कार्यकर्ते प्रदीप घावरे यांनी संताप व्यक्त केला आहे. शहरात बांधण्यात येत असलेले चेंबरना फक्त वरच्या बाजूला सिमेंट प्लास्टर केले जात असल्याने ते बांधकाम अल्पावधीत खराब होईल असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे बांधकामावर नजर ठेवणारे सल्लागार कंपनीचे अभियंते यांची अनुपस्थितीत बहुसंख्य ठिकाणी आढळून येत आहे. त्यामुळे त्या कंपनीला माथेरान नगरपरिषद यांच्याकडून निधी का द्यायचा? असा सवाल माथेरान नागरी पतसंस्थेचे तज्ञ् संचालक गिरीश पवार यांनी उपस्थित केला आहे.