माथेरानला सक्षम नेतृत्वाची गरज

। माथेरान । वार्ताहर ।

कदाचित समाजकारणाची, सामाजिक बांधिलकी, जनहिताची आणि जनसेवेची बिरुदावली राजकारणात आर्थिक मलिदा मिळविण्यासाठी डुंबलेल्या आणि श्रेयवादाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या काही राजकीय पक्षांच्या मंडळींना जे स्वतःला नेते असल्याचा आभास आणून मिरविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांची स्तुती करून पक्षातच अंतर्गत मतभेद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी आटापिटा करीत आहेत. अशा धूर्त लोकांमुळे राजकारणाचे समीकरण बदललेले असून प्रामुख्याने मूठभर मतांसाठी संपूर्ण गावाला विकासापासून रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार्‍या नतद्रष्ट राजकीय लोकांमुळे गावाची उन्नती आजमितीपर्यंत होऊ शकलेली नाही. ज्यांचे राजकीय अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले होते. अशा महाभागांना संजीवनी देऊन पुन्हा राजकीय पटलावर आणण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळेच आजवरच्या कार्यकाळात प्रत्येक विकासात्मक कामात खोडा घालण्या पलीकडे काहीच साध्य झालेले नाही. तीन ते चार पिढ्यांपासून इथला भूमिपुत्र संघर्षाची ठिणगी सोसत आहे. परंतु या भूमिपुत्रांना गृहीत धरून परिसरातुन व्यवसायासाठी आलेल्या इथे ठाण मांडून बसलेल्या असंख्य लोकांचे लांगुलचालन करण्यात राजकीय मंडळी धन्यता मानत आहेत.

माथेरान हे पर्यटनक्षेत्र म्हणून फक्त नावाला प्रसिद्ध आहे. परंतु, इथे येणार्‍या पर्यटकांचा प्रवास सुखकर होत आहे किंवा नाही त्यांना सुविधा उपलब्ध होत आहेत का, त्यांची दिशाभूल होऊन इथे आल्याचा पश्‍चाताप तर होत नाही ना, त्यांची गार्‍हाणी ऐकण्यासाठी संबंधित अधिकारी वर्ग जागृत आहे की नाही, पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत की नाही, सर्व शासकीय अधिकारी वर्ग केवळ पगारापुरता कामे करत आहेत, का त्यांची सुध्दा या गावाच्या बाबतीत काही नैतिक जबाबदारी आहे. की नाही याबाबत आजवर कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकांनी पुढाकार घेऊन या स्थळाला विकसनशील क्षेत्र बनविण्यासाठी ठोस पाऊले उचललेली नाहीत. दर पाच वर्षांनी सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात तेच तेच मुद्दे अधोरेखित करून निव्वळ सर्वसामान्य लोकांना आशेवर ठेऊन स्वतःच्या उन्नतीसाठी धडपड करणारे. महाभाग दिसत असल्याने सत्तेसाठी काय पण अशीच वृत्ती यांच्या नसानसात ठासून भरलेली आहे.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल होत असताना इथे येणार्‍या पर्यटकांना ज्यांच्या जिवावर इथलं सगळं अर्थकारण अवलंबून आहे त्यांना साध्या सोयीसुविधा मिळू शकत नाहीत. मुख्य प्रवेशद्वार असणार्‍या दस्तुरी नाक्यावर ज्याप्रकारे पर्यटकांना त्रासाला सामोरे जावे लागते. त्याबाबत कुणालाही स्वारस्य दिसत नाही. नेरळ माथेरान ह्या एकमेव मार्गामुळे स्थानिकांसह पर्यटकांची कुचंबणा होत असते. आलेल्या पर्यटकांचा निदान प्रवास सुरळीत झाला. तरच इथे सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. जागोजागी जुनी दोनशे ते तीनशे वर्षांपूर्वीची झाडे सुकून जात आहेत त्या झाडांना काटेरी कुंपण सुध्दा वनखात्याच्या आणि वनसमितीच्या माध्यमातून केले जात नाही. याठिकाणी जर हवेतील गारवा शिल्लक राहिला नाही तर इकडे कुणीही फिरकणार नाही. दस्तुरी नाक्यावर उतरल्यावर पर्यटकांना आवश्यक माहिती मिळण्यासाठी माहितीकेंद्र नाहीत त्यामुळे त्यांची दिशाभूल करून खिसा रिकामा करण्यात काही व्यवसायिक तज्ञ झाले आहेत.

नगरपालिका प्रशासन, वनखाते, वनसमिती, पोलीस प्रशासन आणि स्वतःला नेते म्हणवणार्‍या राजकीय पक्षांच्या मंडळींनी एकोप्याने सुवर्णमध्य काढला नाही. तर ह्या सुंदर गावाला धोक्याची घंटा आहे. परिसरातील लोंढे वाढत चालले असून त्यांनी इथे आपले ठाण मांडले आहे, त्यांना या गावाविषयी काही सहानुभूती नाही. त्यांचे अन्य ठिकाणी जोडधंदे आहेत. त्यातच विकासाला चालना देण्याऐवजी नेहमीच विरोध करणार्‍या धूर्त लोकांना वेळीच रोखले नाही, तर ह्या गावाचा विकास भविष्यात होणे अवघड आहे. त्यासाठी अशा लोकांना राजकीय मंडळींनी केवळ मतांसाठी गोंजारने टाळले नाही. तर स्थानिकांना आपला मुक्काम हलवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतांसाठी सहसा इथला कोणताही राजकीय व्यक्ती विरोध घ्यायला तयार नाही. त्यामुळेच तिमिरातून तेजाकडे आगेकूचसाठी माथेरानला निर्भीड, सक्षम नेतृत्व केव्हा मिळणार? असा प्रश्‍न स्थानिकांना सतावतो आहे.

Exit mobile version