माथेरानः प्रभाग आरक्षणात नव्याने उलटफेर

। माथेरान । वार्ताहर ।
सर्वोच्च कोर्टाने नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण दिल्यानंतर आरक्षण सोडतीत बदल करण्यात आले असून, नगरपरिषदेच्या स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात प्रभागांचे आरक्षण आणि सोडत कार्यक्रम घेण्यात आला.

आरक्षण आणि सोडत, नियंत्रक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,कर्जत अजित नैराळे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सोडत पद्धतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्याच्या जागा यांचे संरक्षण संबंधित अधिनियम निश्‍चित करण्यात आले. सोडतीच्या वेळेस प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा व त्याच्या चतुरसीमा दर्शनी ठिकाणी लावण्यात आल्या.

माथेरानची एकूण लोकसंख्या 4393 असून अनुसूचित जातीची लोकसंख्या 623 असून, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 183 आहे. एकूण जागाच्या पन्नास टक्के महिलांच्या जागांपैकी 2 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती आणि 7 सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले होते. पण, एकूण लोकसंख्येच्या 27 टक्के आरक्षण हे इतर मागास प्रवर्गासाठी पडल्याने 7 सर्वसाधारण महिलांपैकी 2 महिला आरक्षण हे इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तसेच 2 हे इतर मागास प्रवर्ग खुला यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

याप्रसंगी माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी पीठासीन अधिकारी अजित नैराळे यांच्या आदेशानुसार आरक्षण सोडत सुरू केली. चौथीमध्ये शिकणार्‍या मनुजा सुरेश शिंदे या विद्यार्थ्याच्या हस्ते प्रभागांसाठी चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण महिला 5, अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1 व इतर मागास प्रवर्ग 2 असे एकूण 10 महिलांचा समावेश असणार आहे. याप्रसंगी सर्व पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे, प्रभाग 1 अ इतर मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 3 अ इतर मागासवर्ग महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 4 अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 5 अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 7 अ अनुसूचित जमाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 8 अ इतर मागासवर्ग महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 9 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण प्रभाग 10 अ इतर मागासवर्ग, ब सर्वसाधारण महिला.

Exit mobile version