रविवारी पहाटे साडेतीन तास वाहतुकीला ब्रेक; माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचे हाल होण्याची शक्यता
| नेरळ | प्रतिनिधी |
पावसाळ्यातील धुक्याचा आनंद लुटण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच, रविवारी माथेरान हिल मॅरेथॉनमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. माथेरान घाटरस्ता पहाटे 5 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत म्हणजेच साडेतीन तास सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी माथेरानकडे जाणाऱ्या पर्यटकांना नेरळमध्येच थांबावे लागण्याची शक्यता असून, नेरळमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
माथेरानच्या 800 मीटर उंचीवरील डोंगररांगांमध्ये विविध धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर माथेरान हिल मॅरेथॉनचा दुसरा अंक रविवारी (दि. 2) रंगणार आहे. यंदा स्पर्धेचा मार्ग बदलण्यात आला असून, कल्याण-नेरळ-कर्जत मार्गावरील सीमा रिसॉर्ट येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
देशभरातून सुमारे 400 स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. 21.1 किलोमीटरची अर्धमॅरेथॉन पहाटे 5 वाजता सुरू होईल. सीमा रिसॉर्ट, माणगाव फाटा, नेरळ, हुतात्मा चौक, माथेरान घाट, जुम्मापट्टी, दस्तुरी असा मार्ग पार करून स्पर्धक पुन्हा माथेरान घाट उतरून नेरळमार्गे सीमा रिसॉर्ट येथे पोहोचणार आहेत. 15 किलोमीटरच्या स्पर्धेतील स्पर्धक जुम्मापट्टी येथून परतीचा मार्ग धरतील.
मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिस आणि वाहतूक विभागाकडून घाटरस्त्यावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे रविवारी माथेरानला मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः नेरळ स्थानक आणि परिसरात पर्यटकांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद
रविवारी पहाटे 5 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर टॅक्सी सेवेलाही सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे माथेरानकडे जाणाऱ्या पर्यटकांनी गर्दी आणि गैरसोय लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.
पर्यटकांनी खबरदारी घ्यावी
रविवारी माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच घाटरस्ता साडेतीन तास बंद राहणार असल्याने पर्यटकांना नेरळमध्ये थांबावे लागू शकते. नेरळ स्थानकावरही मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी वेळेचे नियोजन करूनच माथेरानचा प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







