| माथेरान | प्रतिनिधी |
हेरिटेज वास्तू असणाऱ्या माथेरान रेल्वे स्टेशनमध्ये पर्यटकांना भेडसावत असलेल्या समस्या, त्याचप्रमाणे स्टेशन परिसरातील स्वच्छते बाबतीत महत्वपूर्ण विषयांवर व्यवस्थापन कमिटीची बैठक पार पडली. यावेळी माथेरान रेल्वे स्टेशन व्यवस्थापन कमिटीच्या सदस्यांनी स्टेशन मध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या दूर करण्यासाठी या शिष्टमंडळाने रेल्वेचे सी.सी.आई. शिरीष कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
माथेरान रेल्वे स्टेशनच्या वारसा मालमतेची योग्य प्रकारे दखल घेण्यात यावी, प्रवाशांसाठी आणि व्हीआयपी हालचालींसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था उपलब्ध करावी, मालवाहू बोगीची दोन टन वजनाची क्षमता असावी, पर्यटकांना सुसज्ज अशी दोन शौचालय उभारावीत, प्लॅटफॉर्मवरील संपूर्ण भाग स्वच्छ करण्यात यावा,रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा, संपूर्ण स्टेशन परिसराला संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात, स्तनपान मातांना स्वतंत्र खोलीची व्यवस्था असावी, नेरळ-माथेरान दरम्यान मिनिट्रेन फेऱ्या वाढण्यासाठी वरिष्ठांना सूचित केल्यास पर्यटकांना सोयीचे होऊन पर्यटन वाढण्यास मदत होईल, ऑनलाइन तिकीटांसाठी सुविधा उपलब्ध करावी, शटल सेवेमध्ये एक प्रवासी बोगी वाढविण्यात यावी आणि आजूबाजूच्या भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे त्याचा निपटारा लवकरच करण्यात यावा, अशा सर्व समस्या स्टेशन व्यवस्थापन कमिटीचे आकाश चौधरी, प्रदीप घावरे, राजेश चौधरी, चंद्रकांत जाधव यांनी नेरळ माथेरान रेल्वेचे सीसीआई शिरीष कांबळे, पीएसआय सतीश कांबळे, आरपीएफ प्रमोद कांबळे, स्टेशन मास्टर विनयकुमार, सीसीटीसी हृषीकेश अडेकर यांच्याकडे मांडल्या.
माथेरान स्टेशन व्यवस्थापन कमिटीची बैठक
