| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गवरील स्थानकात असलेल्या हेरिटेज रेल्वे स्थानकाचा पर्यावरणपूरक विकास व्हावा, अशी मागणी स्थनिक रेल्वे व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केली आहे. या रेल्वे मार्गावर पूर्वी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक प्रवास करून येत आणि माथेरानमधील निसर्गाचा आशावाद घेत होते. मात्र, मागील काही वर्षांत फार तुरळक विदेशी पर्यटक माथेरानमध्ये येत असून विदेशी पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वेकडून प्रवासी पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केली. माथेरान रेल्वे स्टेशनमध्ये पर्यटकांना भेडसावत असलेल्या समस्या तसेच स्थानक परिसरातील स्वच्छतेबाबतीत महत्वपूर्ण विषयांवर व्यवस्थापन कमिटीची बैठक पार पडली. यावेळी माथेरान रेल्वे स्टेशन व्यवस्थापन समितीचे सदसय माजी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, चंद्रकांत जाधव आणि माजी नगरसेवक प्रदीप घावरे आदी उपस्थित होते. मध्य रेल्वेकडून कमर्शियल अभियंता शिरीष कांबळे हे पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.







