| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर करण्यात आलेली इन्सिनेटर मशीन ही गेल्या दीड वर्षांपासून निष्क्रिय अवस्थेत पडून आहे. शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या या यंत्रणेचा वापर न झाल्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा चर्चा पाली शहरात होत आहेत.
महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम 1965 व घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार प्रत्येक नगरपंचायतीने ओला व सुका कचऱ्याचे स्वतंत्र संकलन, प्रक्रिया व विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मात्र, पाली नगरपंचायतीकडून या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर ओला व सुका कचरा एकत्रितपणे टाकला जात असून कोणतीही वैज्ञानिक प्रक्रिया राबवली जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, संरक्षण भिंत नसल्यामुळे कचरा रस्त्यावर पसरतो आणि दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याठिकाणी वसाहती, आयटीआय आणि विद्युत महावितरण केंद्र असल्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून इन्सिनेटर मशीन कार्यान्वित करणे, डम्पिंग ग्राउंडला संरक्षक भिंत बांधणे आणि कचरा वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू करणे यासाठी नगरपंचायतीकडे लेखी मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.







