पर्जन्य नोंदीत माथेरान अव्वल

तीन हजार मिमीचा टप्पा पार
| नेरळ | वार्ताहर |

यंदाच्या पर्जन्यनोंदीत माथेरान अव्वव ठरले असून, 25 जुलैपर्यंत येथील पावसाने तीन हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. पावसाची नोंद करणारे पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार अन्वर महापुळे यानी याबाबतची माहिती दिली आहे.

माथेरानला मोठ्या प्रमाणावर असलेल्या वृक्ष आणि वनराई यांच्यामुळे येथील सरासरी 5000 मिमी पावसाची नोंद होत असे. परंतु नेहमी होत असलेल्या वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाची सरासरी देखील खाली आली आहे.माथेरान शहरांत एकूण 3078 मिमी पेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. सर्वसाधारण पर्जन्यमानाची तुलनात्मक टक्केवारी 105.67 अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात माथेरान हे पर्यटनस्थळ प्रथम क्रमांकावर असून कर्जत दुसर्‍या स्थानावर आहे आणि तिसर्‍या क्रमांकावर खालापूर आहे.

माथेरानला यावर्षीची एका दिवसाची म्हणजेच 24 तासांतील, सर्वाधिक पर्जन्यनोंद 354.20 मिमी इतकी 15 जुलैला नोंदविण्यात आली.माथेरानला संपूर्ण जून महिन्यात एकूण 426.10 मिमी तर 26 जुलैपर्यंत एकूण 3078 मि मी अशी नोंद झाली आहे.

Exit mobile version