माथेरान पर्यटकांनी गजबजले

| माथेरान | प्रतिनिधी |

उष्णतेच्या लाटांमधून सुटका करून घेण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले माथेरान पर्यटनस्थळाकडे वळली आहेत. महिन्यातील शेवटच्या विकेंडची सुट्टी सार्थकी लावण्यासाठी मुंबई, पुणे, गुजरातचे पर्यटक माथेरान पर्यटनस्थळी दाखल झाले असून, प्रदूषणमुक्त असे हे निसर्गरम्य, हिरवाईने नटलेले पर्यटनस्थळ पर्यटकांनी गजबजून गेले आहे.

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंत करतात. मुंबई-पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले सुप्रसिद्ध प्रदूषणमुक्त असे थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानला अधिक पसंती मिळते. या मे महिन्यातील शेवटच्या विकेंडला हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. स्वच्छ ताजी हवा, आल्हाददायक निसर्गसौंदर्य, हिरवी वनराई असलेल्या माथेरानला पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. येथील निसर्गरम्य पॉईंट, घोड्याची रपेट आणि लाल मातीच्या रस्त्यावरून भटकंती करताना देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पाऊस पडल्यामुळे सकाळ व संध्याकाळ ढगाळ वातावरण होत आहे. तसेच मे महिन्यातील या शेवटच्या विकेंडला अश्‍वशर्यतींचे आयोजन असल्याने पर्यटकांना अश्‍वशर्यतींचा थरार अनुभवयास मिळणार आहे.आत्ता पुढील जून महिन्यामध्ये शाळा सुरू होणार असल्याने अनेक जण या शेवटच्या विकेंडला सहकुटुंब पर्यटनासाठी आलेले दिसत आहेत. त्यामुळे माथेरान शहरातील हॉटेल्स हे पूर्ण क्षमतेने भरल्याचे चित्र येथे दिसत आहे

Exit mobile version