माथेरानकरांचा अडखळता प्रवास

नविन मिनीबसची प्रतिक्षा कायम

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जतच्या एसटी आगारातून माथेरानसाठी निघालेली मिनीबस माथेरान घाटात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. तब्बल 12 तास उलटले तरी या मिनिबस जवळ अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी पोहोचले नव्हते. दरम्यान, जुन्या गाड्यांची वाहतूक मर्यादा संपली असून कर्जत-माथेरान मिनीबस मधून प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना दररोज अडखळता प्रवास करावा लागत आहे. यामुळे येथील प्रवासी या रोजच्या समस्येला संतापले असून घोषणा झालेल्या नविन मिनीबस कधी येणार, असा प्रश्‍न एसटी महामंडळाला विचारत आहेत.

बुधवारी (दि.3) सकाळी सव्वाआठ वाजता कर्जत आगारातून माथेरान साठी निघालेली मिनीबस माथेरान येथे सव्वानऊ वाजता पोहचली. तेथून पुन्हा कर्जतकडे परतत असताना जूम्मापट्टी येथील गणेश मंदिराजवळ तांत्रिक बिघाडामुळे थांबविण्यात आली. त्यामुळे नाहिलाजाने मिनीबस मधून प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना खासगी वाहनातून पुढचा प्रवास करावा लागला. त्यामुळे वेळ आणि पैसा असा दोन्ही बाबींचा नुकसान झाले. मिनीबसच्या दुरूस्तीसाठी तब्बल 12 तास उलटल्यानंतर रात्रीच्या सुमारास कर्जत आगारातील तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मिनीबस रात्री उशिरा कर्जत आगारात आणण्यात आली. या मिनीबसच्या गियरमध्ये तांत्रीक बिघाड झाला असून ब्रेक सुद्धा व्यवस्थित लागत नसल्याने बंद पडली होती.

मिनी बसचे गियर किंवा संभाव्य ब्रेकमध्से तांत्रीक बिघाडांच्या समस्या या तीव्र उतारावर होत असून दुर्दैवी अपघाती घटना घडण्याची शक्यता आहे. यासाठी या घटनेची तीव्र दखल शासनाने घेऊन कर्जत आगाराला तात्काळ किमान दोन मिनी बसेस देण्याची मागणी त्वरित पूर्ण करावी. अन्यथा काही दुर्देवी अपघात झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार? जनतेने कोणाला जबाबदार धरावे?

नितीन सावंत,
प्रवासी
Exit mobile version