वेळापत्रक बदलले
| नेरळ | प्रतिनिधी |
प्रवाशांच्या सेवेसाठी ही ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी खरोखरच सर्वसामान्य घटकांचा विचार करुन धावताना दिसते. याचा अनुभव माथेरान परिसरातील विद्यार्थ्यांना आला आहे. आता प्रवाशांच्या सेवेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार मिनीबस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
राज्य परिवहन महामंडळाची कर्जत आगाराकडून माथेरान करिता मिनीबस सुरू झाल्यानंतर येथील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जा ये करीत आहेत. मात्र महाविद्यालयात पोहचण्यासाठी आवश्यक वेळेवर असलेली मिनिबस नसल्याने विद्यार्थी यांच्याकडून मिनिबसच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, माथेरानकडे जाणार्या आणि कर्जतकडे जाणार्या मिनीबस यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
माथेरान येथून नेरळ आणि कर्जत जाण्यासाठी कर्जत एसटी आगाराकडून मिनीबस सुरू झाली आणि तेंव्हापासून मोठया प्रमाणात विद्यार्थी हे दहावी नंतर चे शिक्षण घेण्यासाठी माथेरान बाहेर पडली आहेत. कोरोना नंतर माथेरान मिनीबस पुन्हा कर्जत एसटी आगराने सुरू केली असून दररोज कर्जत एसटी आगार ते नेरळ आणि तेथून माथेरान या मार्गावर पाच फेर्या चालवल्या जात आहेत. सकाळी सहा वाजता कर्जत येथून माथेरान साठी पहिली मिनीबस सुटते आणि सायंकाळी पाच वाजता शेवटची तर माथेरान येथून सकाळी सव्वा सात वाजता पहिली तर सहा वाजून दहा मिनिटांनी शेवटची मिनीबस सोडली जाते. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोयीची असलेली ही मिनीबस महाविद्यालयाच्या वेळेनुसार असावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना नेरळ, कर्जत आणि बदलापूर तसेच उल्हासनगर येथील महाविद्यालयात वेळेवर पोहचता येईल. त्यामुळे कर्जीं माथेरान मिनीबस चे वेळापत्रक महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या सोयीचे असावे अशी मागणी करणारे निवेदन माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी कर्जत एसटी आगार प्रमुख यांना केली होती. त्या निवेदनावर माथेरान मधून महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी निर्जला कळंबे, साक्षी ढेबे, पुनम बापर्डेकर, वेदिका मोरे, मोहिनी कदम, सक्सिना चापडे, पल्लवी कोकरे, प्रतीक मोरे, अश्विनी तांबे, मृणाल सुतार, गौरंग गुजर, रोहित सोनवणे, कल्पना आखाडे आदी अनेक विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या.
माथेरान येथून सकाळी सव्वा सात वाजता असलेली मिनीबस नेरळ येथे पोहचायला पावणे आठ वाजतात आणि त्यावेळी महाविद्यालय सुरू झालेले असते. त्यामुळं महाविद्यालयात वेळेवर पोहावण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी वाहनाने जावे लागते. ही समस्या विद्यार्थ्यांनी कर्जत एसटी आगार प्रमुख शंकर यादव यांच्याकडे अनेकदा मागणी केली होती. मात्र विद्यार्थ्यांचा सततचा पुढाकार लक्षात घेवून अखेर कर्जत एसटी आगार प्रमुख यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कर्जत नेरळ माथेरान या मिनीबस चे वेळापत्रक मध्ये सुधारणा करून नवीन वेळा जाहीर केल्या आहेत.21 नोव्हेंबर पासून माथेरान मिनिबस सेवा नव्या वेळापत्रक नुसार चालविली जाणार आहे.नवीन वेळापत्रक नुसार कर्जत येथून आता तब्बल पाऊण तास आधी पहिली मिनीबस सुटणार आहे.त्यामुळे माथेरान येथून आता सकाळी साडे सहा वाजता नेरळ कर्जत करिता साडे सहा वाजता मिनीबस सोडली जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता वेळेवर महाविद्यालय मध्ये पोहचता येणार आहे. नवीन वेळापत्रक कर्जत एसटी आगार यांच्याकडून जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मिनीबसचे नवीन वेळापत्रक
कर्जत ते माथेरान
सकाळी 5-15, सकाळी 8-15,
दुपारी 12-05, दुपारी 14-30,
संध्याकाळी 17-00 वाजता
माथेरान ते कर्जत
सकाळी 6-30, सकाळी9-20,
दुपारी 13-20, दुपारी 15-45,
संध्याकाळी 18-10 वाजता