। नेरळ । वार्ताहर ।
कोविड हद्दपार करण्यासाठी माथेरान या पर्यटनस्थळी नगरपरिषदेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे.आत्ता पर्यंत पहिली मात्रा 99%पूर्ण झाली असून दुसरी मात्रा ही 70% पर्यंत पूर्ण झाली आहे.
माथेरान हे पर्यटनस्थळ असल्यामुळे इथे लाखो पर्यटक भेट देत असतात. इथे कोविड चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून माथेरान नगरपरिषदेने कंबर कसली असून लसीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती करून लसीकरण करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. स्थानिक मंडळी ही याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आत्ता पर्यंत 3838 नागरिकांची पहिली मात्रा पूर्ण झाली असून 2147 नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे.
मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण मोहिमेत जे वयोवृद्ध नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊ शकत नाहीत अश्या नागरिकांसाठी येथील बी. जे हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील सुशिक्षित नागरिक हे घरोघरी जाऊन लसीकरण करीत आहेत. तसेच लसीकरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि शाळेतील शिक्षकांची देखील मदत घेतली जात आहे. यामुळे माथेरानची वाटचाल ही 100% लसीकरणाकडे होत आहे.