। नवी मुंबई । वार्ताहर ।
नवी मुंबई महापालिकेने विजेवर चालणार्या वाहनांसाठी शहरात पहिल्या टप्प्यात 20 चार्जिग केंद्रे उभारण्याची घोषणा केली होती. यातील पहिल्या केंद्राचे काम ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. पुढील 15 दिवसांत हे केंद्र कार्यान्वित करण्यात येईल असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने फेम योजनेअंतर्गत विद्युत वाहनांची निर्मिती व वापर वाढावा यासाठी विशेष धोरण आणले आहे. या अंतर्गत 2030 पर्यंत किमान 18 टक्के वाहने ही विजेवर चालणारी असावीत हे धोरण आहे. महाराष्ट्र शासनानेही नुकतेच आपले धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या बाजारात दुचाकी, चारचाकी, तीनचाकी व बस ही विजेवर चालणारी वाहने बाजारात येत आहेत. एनएमएमटीच्या 180 विद्युत बस आल्या असून त्यातल्या 50 बस सध्या सेवा देत आहेत. तर दुचाकींमध्ये सध्या अनेक पर्याय आले आहेत. चारचाकीमध्येही पाच ते सहा कार सध्या बाजारात आहेत. मात्र पायाभूत सुविधा नसल्याने अजूनही त्यांना मागणी वाढताना दिसत नाहीत. शहरात चार्जिग केंद्रे असणे यासाठी गरजचे आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने शहरात 20 मोक्याच्या ठिकाणी चार्जिग केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. मात्र त्याला गती आली नव्हती. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत या विषयाला हात घालत चार्जिग केंद्रे उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर या कामाला गती आली आहे. नवी मुंबई महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून हे काम पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन यांना दिले असून त्यांनी नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील काम वेगाने सुरू केले आहे. या ठिकाणी सहा युनिट उभारली जाणार आहेत. यातील दोन युनिटचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ केली जाणार आहे. पुढील 15 दिवसांत हे केंद्र कार्यान्वित होईल, असा विश्वास पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे. शहरात अशी 20 चार्जिग केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सदर कंपनीला केंद्र शासनाकडून फेम 2 योजनेतून अनुदानही दिले जाणार आहे.