। माथेरान । वार्ताहर ।
सन 2023-24 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता राबविण्यात आले होते. या अभियानाला विद्यार्थी, शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेत माथेरानसारख्या दुर्गम भागातील वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळेने केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यावेळी जवळपास 95 टक्के विद्यार्थी म्हणजेच शाळांमधील सुमारे 2 कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत उपक्रमात सहभागी झाले होते. यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले आहे. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येदेखील करण्यात आली आहे. या अभियानात तालुका जिल्हा व राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आली आहेत. या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल या शाळेला केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्थानिकांनी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.