म्हसळ्यात मटका जुगाराचा पर्दाफाश

कुंभार आळी परिसरात पोलिसांचा छापा; दोन जण ताब्यात

| म्हसळा | प्रतिनिधी ।

म्हसळा शहरातील कुंभार आळी रोड परिसरात खुलेआम सुरू असलेल्या ‘नाईट महाराष्ट्र’ मटका जुगार अड्ड्यावर म्हसळा पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई सोमवारी (दि.19) सायंकाळी करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अक्षय दौलत पुरी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. म्हसळा येथील कुंभार आळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रंजीत बारटक्के यांच्या घरासमोर विनापरवाना मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी मटका जुगार चालवताना रंगेहाथ आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी महेश घनश्याम जाधव (रा. म्हसळा, बौद्धवाडी) आणि रशीद ऊर्फ काळया रफीक शेख (रा.म्हसळा, कुंभार आळी) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरले जाणारे पावती पुस्तक व पेन असा एकूण 1552 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एन.डी. देवडे करत आहेत.

म्हसळा शहरात छुप्या पद्धतीने मटका आणि गुटखा विक्री सुरू झाली असून खबऱ्यांच्या माहितीनुसार अधूनमधून म्हसळा पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या आदेशाने पोलीस कारवाई करत आहेत. त्यामुळे अवैध व्यवसायांवर आता काही प्रमाणात निर्बंध होत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version