माणगावात व्हॉट्सॲपद्वारे मटका जुगार

सहा आरोपींवर गुन्हा दाखल

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव पोलीस ठाणे हद्दीत निजामपूर शहरात व्हॉट्सॲपद्वारे सुरू असलेल्या मटका जुगार रॅकेटवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. निजामपूर बस स्थानकाजवळील विमल निवास इमारतीच्या जिन्याखाली सुरू असलेला हा जुगार उघडकीस आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून प्रकाश पांडुरंग पाकड याला जुगाराच्या आकडेमोडीसह रंगेहाथ पकडले. त्याचा मोबाईल जप्त करून पंचनामा करण्यात आला आहे. मोबाईलची तपासणी केल्यावर व्हॉट्सॲपद्वारे PakhadDo/No, Praksha Np Konkan, FINAL KHABAR, PAKHD KO/MO अशा नावाचे ग्रुप आढळून आले. या ग्रुपमधून कल्याण नावाचा मटका जुगाराचे आकडे प्रसारित करून स्वतःच्या फायद्यासाठी जुगार खेळवला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी प्रकाश पाकड याच्यासह प्रकाश सावंत रा. निजामपुर, राजेश कांतिलाल छेडा रा. माणगाव, संदीप चव्हाण रा. कुमशेत दहीवली, हितेन छेडा रा. माणगाव, सदानंद जाधव रा. सुरव तर्फे तळे, ता. माणगाव, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण तुणतुणे हे तपास करीत आहेत.

रायगड पोलीसांचा नवा उपक्रम सुरू झाला आहे. गुन्हेगारीविरुद्ध नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी रायगड पोलिसांनी 'रायगड दृष्टी' हा नवा व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू केला आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिक मटका जुगार, अवैध दारू व्यापार, अंमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कारवायांबाबत पूर्णपणे गुप्तपणे तक्रार नोंदवू शकतात. तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरीत पाठवून तातडीने कारवाई केली जाणार आहे.
Exit mobile version