। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
श्री भैरीनाथ क्रीडामंडळ वावे आयोजित कै. गणेश यादव स्मृतीचषक कबड्डी प्रीमियर लीग 2022 चे आयोजन 19 मार्च रोजी करण्यात आले होते. या प्रीमियर लीगचा प्रथम क्रमांकाचा मानकरी माऊली स्पोर्ट्स, तर उपविजेता अर्जुन, आरोही फायटर्स हा संघ ठरला.
या प्रीमियर लीगमध्ये आठ संघमालकांचे आठ संघ सहभागी झाले होते. कबड्डी प्रीमियर लीगचे आयोजन केल्यामुळे सुधागड तालुक्यातील नवोदित खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. या प्रीमियर लीगचा अंतिम सामना संघ मालक अविकांत साळुंखे यांचा माऊली स्पोर्ट्स विरुद्ध धनंजय मस्के यांच्या अर्जुन, आरोही फायटर्स या दोन संघात झाला. त्यात माऊली संघाने बाजी मारली.
प्रथम मानकरी संघास रोख रक्कम एकवीस हजार आणि आकर्षक चषक, तर द्वितीय मानकरी संघास रोख रक्कम पंधरा हजार आणि आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ संघास प्रत्येकी रोख रक्कम सात हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू अविनाश खाडे, उत्कृष्ट चढाई करणारा सूरज मगर तर उत्कृष्ट पक्कड करणारा प्रणय रटाटे आणि पब्लिक हिरो समाधान मोरे यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या कबड्डी प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण श्री भैरीनाथ मंडळ वावे मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांसह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.