माणगावमध्ये मविआचा शिंदे गटाला दे धक्का

16 ग्रामपंचायतींवर सत्ता

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील रविवारी (दि.18) झालेल्या 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीने शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेला जबर धक्का देत 19 पैकी 16 ग्रामपंचायतींवर विजय संपादन केला.

19 पैकी पळसप, करंबेली, टोळ खुर्द या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका बिनविरोध होऊन उर्वरित 16 ग्रामपंचायतींसाठ मतदान झाले होते. मंगळवारी (दि.20) तहसील कार्यालय माणगाव याठिकाणी तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांच्या अधिपत्याखाली व नायब तहसीलदार बी.वाय. भाबड यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी माणगाव तहसील कार्यालय परिसरात विविध पक्षाचे नेतेमंडळी व कार्यकर्ते यांची गर्दी झाली होती. यावेळी तहसील कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरुवातीला आठ ग्रामपंचायतींची मतमोजणी घेण्यात आली. त्यानंतर दुसर्‍यांदा पुन्हा उर्वरित आठ ग्रामपंचायतींची मतमोजणी घेण्यात आली. जसजसे ज्या ज्या ग्रामपंचायतींचे निकाल बाहेर येत होते तसतसे माणगाव तहसील कार्यालय परिसरात विजयी सरपंच व सदस्यांचे कार्यकर्ते, नातेवाईक मित्रपरिवार गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करीत होते.

सविस्तर निकाल
माणगाव तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत निवडून आलेले सरपंच गोरेगांव- झुबेर अंजुम अब्बासी (राष्ट्रवादी), चिंचवली- नंदू रमेश पारावे (राष्ट्रवादी), डोंगरोली- विष्णू सदाशिव कालप (राष्ट्रवादी), दहिवली कोंड- मुस्ताक इस्माईल बंदरकर (राष्ट्रवादी), नांदवी- विनया विष्णू नांदवीकर, न्हावे- तुकाराम पंगोजी शेंपुडे (महाविकास आघाडी), पहेल- करिश्मा प्रसाद मांजरे (महाविकास आघाडी), भागाड- कौशल्या राम वाघमारे (राष्ट्रवादी) ,मुठवली तर्फे तळे- वनिता शांताराम जाधव (राष्ट्रवादी), शिरवली तर्फे निजामपूर- सदानंद रामचंद्र पानसरे (महाविकास आघाडी), साई- हवाबी समीर रहाटविलकर (राष्ट्रवादी), हरकोल- फाईजा इस्तियाक हुर्जुक (महाविकास आघाडी), होडगांव- बळीराम नारायण खाडे (महाविकास आघाडी), कुमशेत- सचिन सखाराम कदम (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट), कुंभे- प्रणाली संतोष भागडे (बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट), मांगरूळ- शितल योगेश वारीक (बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट) तर बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सरपंच पळसप ग्रामपंचायत लक्ष्मण कानू केंबळे, टोळ खुर्द ग्रामपंचायत आरती विनायक सुतार, करंबेली ग्रामपंचायत अल्पेश अर्जुन मोरे.

Exit mobile version