राज्यपालांच्या विरोधात मविआचा संताप

भाजपनेही हात झटकले

| मुंबई | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबती अवमानकारक वक्तव्य करणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात रविवारी राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. विरोधी मविआने कोश्यारी यांना माघारी बोलवावे, अशी मागणी सरकारकडे केली. या गदारोळात भाजपनेही कोश्यारी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगत हात झटकले.

औरंगाबाद येथील विद्यापीठ दीक्षांत सोहळ्यात राज्यपालांनी नव्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श न ठेवता नितीन गडकरी, शरद पवार यांचा आदर्श नजरेसमोर ठेवावा, असे वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले होते. यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांनी राज्यपाल पदावर राहावं का? याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यपालांना सद्बुद्धी लाभो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करत असल्याचेही म्हटले आहे. तर ,छगन भुजबळ,अमोल कोल्हे, काँग्रेसचे सचिन सावंत यांनी कडाडून टीका केली आहे.

राऊतांची शिंदेवर टीका
आम्ही महाविकास आघाडीत गेलो, म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आणि म्हणून तुम्ही पक्ष सोडला. इथेतर भाजपाने त्यांच्या राज्यपालाने अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं आहे, तरीही तुम्ही सत्तेला चिकटून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे. अशी टीका खा.संजय राऊत यांनी केली आहे.

दानवे यांना अटक
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्याने औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये अंबादास दानवे सहभागी झाले होते. पोलिसांना त्यांना अटक केली आहे.

फडणवीस यांनी उत्तर द्यावे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असो किंवा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशी वक्तव्य केली जात असताना मी तरी किती बोलायचं. समाज हे सर्व बघत आहे. यांनी केलेली वक्तव्य खरी असतील तर त्यांनी समोर येऊन ते खरे कसे आहेत हे सांगावं. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं. कारण त्यांच्या पक्षातील नेतेच असे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी याचे उत्तर द्यावेत अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते परभणीत बोलत होते.

भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली असं म्हटलं. त्रिवेदी यांच्या या वक्तव्या विरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीका होत आहे.

Exit mobile version