शेकाप,शिवसेना, राष्ट्रवादी,काँग्रेसचा सहभाग
। पनवेल । वार्ताहर ।
गेल्या काही दिवसापासून दररोज केंद्र शासनाकडून पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत चालले असून सर्वसामान्यांचे गॅस व भाजीपाल्याच्या वाढत्या दरामुळे दररोजचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीविरोधात बुधवारी ( 13 एप्रिल) पनवेलमध्ये शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस व समाजवादी या महाविकास आघाडीच्या पक्षाने एकत्र येवून दणदणीत मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध केला. या मोर्चाचे नेतृत्व पनवेल आ.बाळाराम पाटील,शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील व सचिव सुदाम पाटील यांनी केले.
यावेळी मोर्चेकर्यांसमोर बोलताना शेकापचे आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे रडकुंडीला आलेल्या सामान्य जनतेच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी असून या सर्व समस्यांमधून सामान्य माणसाला त्वरित दिलासा देण्यासाठी व केंद्र सरकारचा जाहीर आणि तीव्र निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे पनवेल मध्ये भव्य व धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने केंद्र सरकारविरुद्ध प्रक्षोभ यावेळी दिसून आला असल्याचे त्यांनी सांगितले.शिवसेनेचे बबन पाटील,शिरीष घरत यानीही मोर्चेकर्यांना मार्गदर्शन केले.
शहरातील नीलकंठ दर्शन जवळील मोकळ्या भूखंडापासून सकाळी मोर्चाची सुरूवात झाली. त्यानंतर एस टी स्टॅण्ड समोरून पनवेल मध्ये प्रवेश करून लाईन आळी – आदर्श नाक्यावरून डावीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार तेथून उजवीकडून भाजीमार्केट रस्ता – टपाल नाका – महात्मा गांधी रोड कापड बाजार – जय भारत नाका – महानगरपालिका – प्रांत ऑफिस असा धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, आमदार बाळाराम पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस तथा महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, जेष्ठ नेते जी.आर.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील, सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, शेकापचे विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, मनपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, रामदास पाटील, रामदास शेवाळे आदींसह महाविकास आघाडीचे नेते आणि हजारो कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थिती मोर्चा पडला.