पनवेल कृउबासाठी मविआचे नवीन उमेदवार

| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीची अत्यंत चुरशीच्या वातावरणात 30 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने 18 जागांसाठी 18 उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील एकाही संचालकाला उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीने यंदा सर्व नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. सुनिल दुकल्या सोनावळे (ग्रामपंचायत मतदार संघ) हे अपवाद ठरले आहेत.

मुंबईचे प्रवेशद्वार असणार्‍या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पनवेल उरण तालुक्याबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी आपले शेती उत्पादन घेऊन पनवेलच्या बाजारात येतात. शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या या बाजार समितीवर सातत्याने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेली आहे.

यंदा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी महाविकास आघाडीतर्फे सर्वसाधारण मतदार संघासाठी नारायण गोमाजी घरत, देवेंद्र गंगाराम मढवी, अशोक गणू गायकर, मच्छिंद्रनाथ गणा पाटील, बाळकृष्ण नारायण पाटील, महादू गोपाळ पाटील, अर्जुन पांडुरंग गायकर, महिला राखीव – ललिता गोपिनाथ फडके, सपना जीवन म्हात्रे, सुभाष हरिभाऊ पाटील (इतर मागास वर्ग), सखाराम गंगाराम पाटील (भटक्या विमुक्त जाती), ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण कांचन नारायण घरत (काँग्रेस), प्रताप चंद्रकांत हातमोडे (शिवसेना), देवेंद्र अनंत पाटील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक), सुनिल दुकल्या सोनावळे (अनु. सुचित जाती/जमाती), व्यापारी मतदार संघ सर्वसाधारण वसंत काशिनाथ फडके, दिनेश ज्ञानेश्‍वर महाडिक, हमाल/मापाडी मतदार संघातून सर्वसाधारण सोमनाथ जनार्दन म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

Exit mobile version