मावळात बारणेंची मदार भाजपवर

| पिंपरी | वृत्तसंस्था |

मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना भाजपचे घाटाखालील म्हणजेच उरण, कर्जत व पनवेल येथील आणि घाटावरील म्हणजेच पिंपरी, चिंचवड व वडगाव मावळ या मतदारसंघातील मित्रपक्षाचे विशेषत: भाजपचे कार्यकर्ते कितपत काम करतात यावरच बारणेंची ‘हॅटट्रीक’ अवलंबून आहे.

मावळात तिसर्‍यांदा बारणे यांना उमेदवारी मिळण्यापूर्वी हा मतदारसंघ शिंदे गटाला व बारणेंना देण्यास भाजपचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी उघड भूमिका घेतली होती. तत्पूर्वी भाजपच्या मावळच्या कोअर समितीच्या दोन बैठकांतही बारणे यांना विरोध केला होता. भाजपलाच ही जागा द्यावी, अशी स्पष्ट भूमिका पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, बाळा भेगडे, चिंचवडच्या आ. अश्‍विनी जगताप, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप आदी भाजप नेत्यांनी घेतली होती.

उमेदवारी मिळाल्यानंतर बारणे यांनी आमदार जगताप, आमदार ठाकूर, शंकर जगताप व बाळा भेगडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यापैकी पनवेल येथे ठाकूर यांनी बैठक घेऊन काम सुरु केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.6) पुण्यात पिंपरी चिंचवड शहर व मावळ विधानसभा मतदारसंघाची बैठक घेवून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी मावळ भाजप तालुकाध्यक्ष भाऊ गुंड आदी उपस्थित होते. मावळ भाजप तालुका प्रचार प्रमुख रवि भेगडे यांनीच फक्त सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते. अन्य कार्यकर्त्यांनी मात्र प्रचाराला अद्याप सुरुवात केलेली नाही. मावळात महायुतीच्या बारणेंविरोधात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे अशी लढत असताना पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीतील अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून असलेल्या वाघेरे यांचा नवा चेहरा तर; दोन वेळा खासदार असल्याने मित्रपक्षात असलेली नाराजी, अशा वातावरणात बारणे यांची मदार भाजपवरच असल्याने प्रदेश पातळीवरील नेत्यांनी सांगितल्यावर तरी भाजपचे कार्यकर्ते बारणे यांचे काम नेटाने करतील का? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version