पंतप्रधानांसह राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी राहिले मोलाचे योगदान
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या मॅक्सचे मंगळवारी (दि.13) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. रायगड पोलीस दलातील श्वान पथकात कार्यरत असणाऱ्या मॅक्सचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मॅक्सचा जन्म 10 मार्च 2017 मध्ये झाला होता. रायगड पोलीस दलात 17 मार्च 2018 मध्ये रुजू झाला. रायगड पोलीस दलातील श्वान पथकामध्ये आठ वर्ष दहा महिने तीन दिवस सेवा केली. लॅब्रोडरी जातीमधील असलेल्या मॅक्सने मध्य प्रदेश येथील ग्वालिअरमधील टेकनपूरच्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण पूर्ण केले. स्फोटक पदार्थ शोधणे असे त्याचे कामाचे स्वरूप होते. 436 व्हीव्हीआयपी कॉल, व 400 व्हीआयपी बंदोबस्त मॅक्सच्या माध्यमातून झाले आहेत. पेण बस स्थानकातील थ्रेड कॉल, माणगाव, रोहा, खालापूर येथील गावठी बॉम्ब शोध, श्रीवर्धन, अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील स्मोकर सेल, रेवदंडा येथील बोयावरील जीपीएस शोधण्यासाठी मॅक्सचे मोलाचे योगदान राहिले आहे.
