कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत नवोदितांची कमाल

। पुणे । प्रतिनिधी ।

बजरंग पुनिया आणि विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात थेट प्रवेश देण्याच्या वादग्रस्त निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या कुस्ती निवड चाचणीला मल्लांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या गटात उदयोन्मुख खेळाडूंनी प्रतिष्ठित खेळाडूंना शह देत आपला ठसा उमटवला. ऑलिम्पिकपटू अंशू मलिक, जागतिक स्पर्धेचा अनुभव असलेल्या सरिता मोर, दिव्या काकरन आणि भातेरी अशा वलयांकित कुस्तीगिरांना नमवून महिला गटातून नव्या पिढीने उचल घेतल्याचे चित्र निवड चाचणीच्या निकालावरून समोर आले. यामध्ये किरण, मानसी, सोनम मलिक या महिला कुस्तीगिरांचे विजय लक्षवेधी ठरले. यातही 57 किलो वजनी गटात मानसी निवड चाचणीची प्रमुख आकर्षण ठरली.

निवड चाचणीच्या पहिल्या दिवशी, शनिवारी महिलांच्या सहा वजनी गटासाठी 71, तर पुरुषांच्या ग्रीको-रोमन विभागासाठी 104 मल्लांची नोंद झाली होती. पालकांचा उत्साह आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे सामन्यांच्या ठिकाणी कुणाला न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. महिलांच्या 57 किलो वजनी गटातील निर्णय सर्वात सनसनाटी ठरला. या गटातून अंशू आणि सरिता मोर यांचे वर्चस्व अपेक्षित होते. मात्र, या वजनी गटात मानसीने बाजी मारली. सरिताने एकतर्फी लढतीत अंशूचे आव्हान परतवल्यावर अंतिम लढतीत मानसी आणि सरिता समोरासमोर आल्या. त्यात मानसीने 9-6 असा विजय मिळवला. अनुभवी दिव्याला 76 किलो वजनी गटात किरणने 10-1 असा शह दिला.

न्यायालयाचा नकार
वृबजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्याच्या हंगामी समितीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. बजरंग आणि विनेश यांना निवड चाचणीत न खेळताच भारतीय संघात स्थान देण्याच्या निर्णयाविरोधात महिला गटातून अंतिम पंघाल आणि पुरुष गटातून सुजित कलकल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या संदर्भात न्यायालयाने शनिवारी सुनावणी करताना याचिका फेटाळून लावली आणि निवड चाचणीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

निकाल (विजेते)
ग्रीको-रोमन (पुरुष) – 60 किलो : ग्यानेंद्र (सेनादल), 67 किलो : नीरज (दिल्ली), 77 किलो : विकास (रेल्वे), 87 किलो : सुनील कुमार (रेल्वे), 97 किलो : नरेंदर (पंजाब), 130 किलो : नवीन (सेनादल).
महिला – 50 किलो : पूजा (हरियाणा), 53 किलो : अंतिम पंघाल (हरियाणा), 57 किलो : मानसी (रेल्वे), 62 किलो : सोनम मलिक (हरियाणा), 68 किलो : राधिका (हरियाणा), 76 किलो : किरण (रेल्वे).

Exit mobile version