लंगडत, पडत, सावरत… तो एकटा लढला!

वेदनेवर विजय मिळवत अफगाणिस्तानला एकटा नडला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

नुकताच अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 291 धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघांच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आले होते. मात्र, ग्लेन मॅक्सवेल याने एकाट्याने खिंड लढवली.


ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर इब्राहिम झद्रान याच्या शतकाच्या जोरावर 291 धावसंख्या गाठली. अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग कऱताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. ऑस्ट्रेलियाने 20 षटकांच्या आत 7 गडी गमावले होते. मात्र, ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे अफगाणिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं. त्याला पॅट कमिंस यानेही उत्तम साथ दिली.


ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात द्विशतक झळकावलं. फलंदाजी करताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला नीट पळताही येत नव्हतं, पण तरीही तो खेळत राहीला आणि ऑस्ट्रेलिया संघाला विजयाचा उंबरठा पार करुन दिला. त्याने या सामन्यात फक्त 128 चेंडूत 201 धावांची झुंजार खेळी केली. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल पहिलाच फलंदाज ठरला आहे.

ग्लेन मॅक्सवेलची दुखापत
ग्लेन मॅक्सवेलची ही द्विशतकी खेळी वेदनांनी भरलेली होती. मुंबईच्या आद्रतायुक्त वातावरणात जसजशी मॅक्सवेलची इनिंग पुढे सरकत होती तसतचे त्याच्या संपूर्ण शरिरात क्रॅम्प येत होते. त्याला फक्त अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचाच नाही तर या क्रॅम्पशी देखील लढायचं होतं. मात्र शरीर साथ देत नसतानाही त्याने आपल्या संघाचा विजय एकहाती खेचून आणला. त्याला गेल्या सामन्यात दुखापतीमुळं संघाबाहेर रहावं लागलं होतं. गोल्फ कार्ट दुर्घटनेमुळे त्याला दुखापत झाली होती.

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तासोबत विजय मिळवत सेमी फायनल गाठला आहे. या सामन्याचा हिरो ग्लेन मॅक्सवेल पुढच्या सामन्याला मात्र मुकण्याची दाट शक्यता आहे. तो बांगलादेशविरूद्धचा सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये कधी चांगली तर कधी वाईट कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मॅक्सवेल वर्ल्डकपच्या शेवटच्या टप्प्यात अनफिट असणं परवडणारं नाही.

Exit mobile version