सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर कारवाईचे संकेत
टपऱ्या, हॉटेल्समध्ये जनजागृती पोस्टर्स लागणार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागला केवळ स्वच्छ व सुंदर नव्हे, तर व्यसनमुक्त, निरोगी आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याचा मानस असून, चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या व हॉटेल्समध्ये जनजागृती पोस्टर्स लावले जाणार आहेत, असा निर्धार अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी केला आहे. भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी हा संकल्प हाती घेतला आहे.
अलिबाग नगर परिषदेच्यावतीने शनिवारी (दि.15) स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थित नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा केला.
यावेळी नगराध्यक्षा अक्षया नाईक म्हणाल्या की, आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी प्रवास साजरा करत आहोत. पुढील पिढीला व्यसनमुक्त ठेवणे हीच त्यांच्यासाठीची सर्वात मोठी देशसेवा आहे. अलिबाग नगर परिषद जनजागृती, शिक्षण आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या तीन माध्यमांतून व्यसनमुक्त अलिबाग हा संकल्प प्रत्यक्षात उतरवेल, असा विश्वास व्यक्त केला.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समाजात आरोग्याविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने धूम्रपान व तंबाखूविरोधी रॅली, पथनाट्ये, जनसंवाद आणि सामूहिक प्रतिज्ञा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी दिले. 15 सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या, हॉटेल्स, बसस्थानके तसेच इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी तंबाखूविरोधी जनजागृती करणारे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत देत नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाईक यांनी केले.
आजची तरुण पिढी हेच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. व्यसनमुक्त युवक, स्वच्छ शहर आणि हरित पर्यावरण हीच खरी स्वातंत्र्याची ताकद आहे. अलिबागला पर्यटकांसाठी अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर बनविण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील, असे अक्षया नाईक यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी सागर साळुंखे, सभापती अनिल चोपडा, नगरसेवक अश्विनी ठोसर, निवेदिता वाघमारे, ॲड. ऋषिकेश माळी, सागर भगत, योजना पाटील, शैला भगत, प्रदीप नाईक, आनंद पाटील, जमाल सय्यद, अंकित बंगेरा, संदीप पालकर आणि श्वेता पालकर यांच्यासह नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि अलिबाग नगर परिषदेचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबाग शहरातील चहाच्या टपऱ्या, पानपट्ट्या, हॉटेल्स व इतर आस्थापनांमध्ये नो स्मोकिंग जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व विविध संस्थांकडून धूम्रपानमुक्त परिसराचे घोषणापत्र घेतले जाणार आहे. पर्यटकांसाठीही कोटपा कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
– ॲड. मानसी म्हात्रे, उपनगराध्यक्षा, अलिबाग नगरपरिषद







