। पनवेल । वार्ताहर ।
पोलिस दलातील नोकरी म्हणजे 24 तास तणाव. सार्वजनिक सुटी असो, निवडणुका असोत वा बंदोबस्त; कायम सतर्क राहावे लागते. मात्र त्यातूनही वेळ काढून आपली आवड जोपासत मयुरी खरात यांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत उल्लेखनीय कामगिरी करून वेगळा ठसा उमटवला आहे. नवी मुंबई पोलिस दलात 2010 मध्ये भरती झालेल्या मयुरी खरात यांचे शालेय शिक्षण कळंबोली येथील सुधागड हायस्कूलमध्ये झाले. शालेय जीवनापासून त्यांना खेळात रुची होती. त्यांनी विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवले आहे; परंतु मयुरी यांचा कल होता कराटेमध्ये. त्यामुळे कराटेमध्येच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
पोलिस दलात सामील झाल्यानंतर त्यांनी खेळात भाग घ्यायचे ठरवले होते; परंतु कराटे हा क्रीडा प्रकार पोलिस दलातील खेळांमध्ये नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती; परंतु पोलिस दलामध्ये 2018 मध्ये कराटे खेळाचा समावेश करण्यात आला आणि खर्या अर्थाने मयुरी यांच्या कराटेमधील आपली गुणवत्ता सिद्ध करता आली.
पोलिस दलात भरती होण्यापूर्वी पनवेलमधील नावाजलेले कराटे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय कराटे पंच सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी कराटेमध्ये प्रावीण्य मिळवले असून अनेक पदके मिळवली आहेत. कोरोना काळात निर्बंध शिथिल झाल्यानंतर कळंबोली येथील पोलिस मुख्यालयात त्यांनी संपत्ती येळकर यांचे प्रशिक्षण लाभले.