मुलांमध्ये कोल्हापूर तर मुलींमध्ये पालघर विजेते
। पुणे । वार्ताहर ।
बालेवाडी (पुणे) येथील खा. शरद पवार क्रीडानगरीत पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस, संदिप बालवडकर स्पोर्टस फाऊंडेशन, चेतक स्पोर्टस् फाऊंडेशन व धर्मवीर कबड्डी संघ यांच्या संयुक्त विद्यवाने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त 48 वी कुमार गटात मुलांमध्ये कोल्हापूर तर मुलींमध्ये पालघर संघ विजेता ठरला.
मुलींच्या अंतिम सामन्यात पालघर संघाने पुणे संघावर 32-30 अशी मात करीत स्पर्धेचे अंतिम विजेतपदासह स्व.चंदन पांडे परभणी फिरता चषकावर आपले नाव कोरले. पालघर जिल्ह्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा त्यांनी ही किमया साधली. सामना संपायला शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना 27-27 अशी बरोबरी असताना जुली मिस्किटाने आपल्या एकाच चढाईत 3 गडी टिपत पालघरला आघाडीवर नेले आणि शेवटी दोन गुणांनी बाजी मारली.
मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाने मुंबई उपनगर संघावर 40- 27 असा दणदणीत विजय मिळवित स्व. नारायण नागो पाटील-रायगड या फिरत्या चषकासह विजेतेपद पटकाविले. मध्यंतराला कोल्हापूर संघाकडे 24- 9 अशी भक्कम आघाडी होती. कोल्हापूर संघाने सामन्याच्या सुरवातीपासुन सामन्यावर पकड ठेवली होती. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीप बालवडकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आस्वाद पाटील, राजेंद्र देशमुख, किशोर कांबळे, दत्तात्रय बालवडकर, संजय बालवडकर, नितीन बालवडकर, शाम बालवडकर, मेहबुब शेख, वासंती बोर्डे, रविंद्र आंदेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा भोसले यांनी केले.