रेयाल माद्रिदच्या जेतेपदात पदार्पणवीर एम्बापेची चमक

। वॉरसॉ । वृत्तसंस्था ।

तारांकित आघाडीपटू किलियन एम्बापेने पदार्पणात साकारलेल्या गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने अटलांटाचा 2-0 असा पराभव करत युएफा सुपर चषक फुटबॉलचे जेतेपद पटकावले. गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीग जिंकणार्‍या संघांमध्ये ही लढत खेळवली जाते. यंदा या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. विश्‍वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना होणार्‍या एम्बापेचा रेयाल माद्रिदसाठी हा पहिला सामना होता. त्याला आपले गोलचे खाते उघडण्यासाठी फार वाट पाहावी लागली नाही. त्याने 68व्या मिनिटाला गोल नोंदवत रेयालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी इटालियन संघ अटलांटाने बलाढ्य स्पॅनिश संघ रेयालला कडवी झुंज दिली. एम्बापे, व्हिनिशियस ज्युनियर, ज्युड बेलिंगहॅम आणि रॉड्रिगो या रेयालच्या आक्रमणपटूंकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, प्रथमच एकत्रित खेळत असल्याने त्यांचा ताळमेळ जुळायला वेळ लागला. अटलांटाने पूर्वार्धात रेयालला रोखले होते. त्यामुळे मध्यंतराला दोन संघांत गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र रेयालच्या आक्रमणाला धार आली. 59व्या मिनिटाला व्हिनिशियसच्या पासवर फेडेरिको वालवेर्डेने गोल करत रेयालला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रेयालने अटलांटाच्या बचाव फळीवर दडपण कायम राखले. याचा फायदा त्यांना 68व्या मिनिटाला मिळाला.

Exit mobile version