| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील ओवे गाव येथील स्मशानभूमीजवळ मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून जेरबंद केले आहे. शफी अहमद इक्बाल अहमद शेख (46) असे या व्यक्तीचे नाव असून अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याजवळ असलेला 52 ग्रॅम वजनाचा 5 लाख 20 हजार रुपये किमतीचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे.
ओवे गाव येथील स्मशानभूमीजवळ एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने सापळा लावला होता.
या ठिकाणी शफी अहमद इक्बाल अहमद शेख हा संशयास्पदरीत्या आल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ प्लास्टिक पिशवीमध्ये ब्राऊन रंगाच्या पावडर सारखा एमडी हा अमली पदार्थ व वजन काटा मिळून आला. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याजवळ सापडलेला अमली पदार्थ जप्त केला. तसेच त्याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.