पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील यांची कार्यशाळा संपन्न
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र नरबळी आणि अन्य अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्याच्या दशकपूर्ती निमित्त अंनिसने जादूटोणा विरोधी कायदा जनसंवाद यात्रा काढली होती. यानिमित्त माणगाव पोलिस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती व्हावी, कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा. यासाठी पोलिस कर्मचारी आणि पोलिस पाटील यांच्यासाठी कायदा प्रशिक्षण संपन्न झाले.
यावेळी अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य व देवदासी जटा प्रथा निर्मूलन कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी पोस्टरच्या माध्यमातून कायद्यातील विविध तरतुदी व 12 अनुसूचींची माहिती दिली. या कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय पोलिस अधिकारी नितीनकुमार पोंदकुले यांच्याहस्ते अंनिस कार्यकर्ते भगवान रणदिवे यांच्या पाण्याचा दिवा पेटवणे या प्रयोगाने झाली.
अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले, तसेच कार्यक्रमासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. यावेळी पत्रकार राजीव देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य सल्लागार व ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.