| मुंबई | प्रतिनिधी |
आग्रीपाड्यातील एका उच्चभ्रू वसाहतीतील एका सदनिकेत चक्क एमडी ड्रग्जचे उत्पादन सुरू असल्याची बाब अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईतून उघड झाली. या कारवाईमुळे एमडी हा अत्यंत घातक मात्र सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या रासायनिक अमली पदार्थाचे उत्पादन कोणीही, कोठेही अगदी सहजरीत्या घेऊ शकते, हे धक्कादायक वास्तव समोर आले. या कारवाईत मामुनी सरकार या तरुणीसह शोएब मन्सूरी आणि सूफियान मन्सूरी यांना अटक करण्यात आली.
अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत जगदाळे यांना आग्रीपाड्यातील यास्मिन टॉवर या उच्चभ्रू वसाहतीतील एका सदनिकेत एमडीचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदाळे आणि पथकाने सदनिकेवर छापा घातला. यावेळी पोलीस पथकाला तब्बल 50.74 कोटी रुपयांचे तयार एमडी सापडले. त्यासोबत आवश्यक असलेली रसायने, यंत्रसामग्रीसह देशी बनावटीचे पिस्तूल आणि 19 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा पथकाने जप्त केला. अटक आरोपींना अमली पदार्थनिर्मितीचा अनुभव नाही. तसेच या आधी विक्रीतही त्यांचा सहभाग नव्हता. तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तिघांचेही शिक्षण जेमतेम आहे. यातील शोएब हा प्रमुख आरोपी असून, त्याच्या विरोधात जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, हाणामारीचे तब्बल 23 गुन्हे नोंद आहेत. त्याला एमडीचे व्यसन होते. मात्र, सेवन करता-करता त्याने थेट या अमली पदार्थाचे उत्पादन सुरू केले.
आजवर राज्यात विविध पोलिस दलांनी अनेक एमडी कारखाने उद्ध्वस्त केले. त्या सर्वच प्रकरणांमध्ये अटक झालेल्यांपैकी किमान एका आरोपीकडे रसायनशास्त्राची पदवी किंवा रसायनांचे आवश्यक ज्ञान आहे. या कारवाईत आरोपींचे शिक्षण आणि निवडलेल्या ठिकाणामुळे एमडीचे उत्पादन कोणीही, कोठेही घेऊ शकते, असे निरीक्षण अधिकाऱ्याने नोंदविले. देशात सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून सुरू असलेल्या एखाद्या कारखान्यात शोएबने एमडी उत्पादनाचे धडे घेतले असावे किंवा त्याला कोणीतरी ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन करत असावे, असा अंदाज असून, त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे उपआयुक्त ढवळे यांनी स्पष्ट केले.
कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त
