साडेपाच लाखांचे एमडी जप्त

| पनवेल | वार्ताहर |

गुन्हे शाखा पोलिसांनी खारघर येथून 5 लाख 20 हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी एका नायझेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. खारघर सेक्टर 35 येथे एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. यावेळी तिथे आलेल्या एका नायझेरियन व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अब्दुल राक हसन (34) असल्याचे सांगितले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडे 5 लाख 20 हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. ग्राहकांना पुरवण्यासाठी हे अमली पदार्थ घेऊन तो त्याठिकाणी आला होता. याप्रकरणी त्याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील काही विभागांप्रमाणे खारघरमध्येही मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मुख्यत्वे झोपडपट्टी परिसरात हे अवैध धंदे अधिक होत असल्याचे कारवाईतून समोर आले आहे. याची पालेमुळे नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून, सातत्याने यासंदर्भातील कारवाई करण्यात येत आहेत.

Exit mobile version