| पनवेल | वार्ताहर |
तेलंगणा राज्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला पनवेलमधील आदई गावात अमली पदार्थांचा साठा सापडला आहे. शिवसाई इमारतीमध्ये 4 किलो 98 ग्रॅम वजनाचा व 3 कोटी 48 लाख रुपये किमतीचा मेथाक्युलॉन अमली पदार्थ हस्तगत केला असून, या प्रकरणी बेन व एका नायझेरियन महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तेलंगणामधील सायरागाद पोलिस स्टेशनचे पथक फसवणुकीच्या गुन्ह्यामधील आरोपींचा शोध घेण्यासाठी पनवेलमध्ये आले होते. खांदेश्वर पोलिसांनी या पथकाला सहकार्य करत आरोपीच्या शोधात आदईमधील शिवसाई इमारतीत प्रवेश केला. तेथील घराचा दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरामध्ये एका पिशवीमध्ये 68 लाख 25 हजार रुपये किमतीचे 975 ग्रॅम अमली पदार्थ व चार पिशव्यांमध्ये प्रत्येकी 70 लाख रुपये किमतीचे प्रत्येकी 1 किलो 1 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले. तसेच तळोजा जेल रोडवरून टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे जाणार्या रोडवर अमली पदार्थविरोधी पथकाने प्रिन्स ऑडवीन व अॅनी बेन्जामीन या दोन आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले आणि 5 लाख 78 हजार रुपये किमतीचा 56 ग्रॅम मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ जप्त केला असून, त्यांच्यावर खारघर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.