अकरा कोटीचा एमडीचा साठा जप्त

मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने ड्रग्जविरोधात मोठी कारवाई केली. दिल्ली ते पुणे व्हाया मुंबई असा बसने प्रवास करणाऱ्या एका ड्रग्ज माफियाला विलेपार्ले येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने केली असून आरोपीकडून कोकेन व एमडीचा तब्बल 11 कोटी 28 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

अक्षयी कांदियली (21), मुळचा केरळ असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो दिल्ली ते पुणे असा बस प्रवास करत असून ती बस मुंबईमार्गे जाणार असल्याची खबर युनिट-9 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक सचिन पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली सपोनि उत्कर्ष वझे, उपनिरीक्षक सुजित म्हैसधुणे तसेच सुनील म्हाळसंग, बाबा शेळके, राकेश कदम, मिलिंद परब या पथकाने त्या बसचा माग काढण्यास सुरुवात केली. बस विलेपार्ले येथे थांबणार असल्याची पक्की माहिती मिळताच पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. दिल्लीहून पुण्याला निघालेली ती बस विलेपार्ले येथे येताच पथकाने बसमधून प्रवास करणाऱया त्या ड्रग्ज तस्कराला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळल सात कोटी सहा लाख रुपये किंमतीचे 3.530किलो वजनाचे मेफेड्रिन आणि 2.422 किलो वजनाचे व चार कोटी 22 लाख रुपये किंमतीचे कोकेन असा तब्बल 11 कोटी 28 लाख रुपये किंमतीचा ड्रग्जचा साठा जप्त केला. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास युनिट-9 करीत आहे.

Exit mobile version