अनधिकृत भरावाला स्थानिक प्रशासनाचा अर्थपूर्ण पाठिंबा; ग्रामस्थांचा आरोप
। अलिबाग ।
अलिबाग तालुक्यातील मिळकतखारमधील वासवानी ग्रुपकडून होणार्या भरावाचा वाद चांगलाच तापला आहे. अशातच तहसिलदारांनी अनधिकृत कामाला स्थगित करण्याचे आदेश दिल्यानंतरही काम सुरु ठेवल्यामुळे तलाठी सुदर्शन सावंत आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत गुरुवारी मिळकतखारमधील ग्रामस्थांनी तहसिलदार तसेच जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली होती. त्यानूसार प्रशासनाने तलाठी तसेच स्थानिक प्रशासनाला घटनास्थळी जाऊन काम बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार तलाठी सुदर्शन सावंत यांनी भराव करण्याचे काम बंद केले. मात्र घटनास्थळावरुन निघाल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा भरावाच्या कामाला सुरुवात झाली.
अनेकदा तक्रारी करुनही रेणूका हरकीसनदास वासवाणी व गोविंत बुलचंद वासवानी रिसोर्ट प्रा. लि तर्फे मिळकतखारजवळील सारळपूल ते आवळीपाडा येथील कांदळवनाच्या 120 एकर जागेत भराव टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे मिळकतखार, रेवस, सारळ, म्हात्रोळी, चिडीपाडा येथील 300 हेक्टर भातशेती संकटात सापडली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी पुन्हा एकदा प्रशासनाला निवेदन दिले. ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळफेक करीत प्रशासनाने पोकळ दिखावा करीत कारवाई केली. यावरुन प्रशासनाचा या भरावाला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मिळकतखार येथील जागा किनार्यालगत असून पर्यटन व्यवसाय करण्याच्या हेतूने 120 एकर जागेत रिसोर्ट उभारण्याचा वासवानी यांचा मानस आहे. त्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून वासवानी यांना पाठिंबा दिला जात असल्याचे आरोप विनय कडवे यांनी केला आहे.
वारिष्ठांच्या आदेशानूसार घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. तसेच भरावाचे काम थांबविण्यात आले. त्यांनतर वरिष्ठांना काम बंद केल्याचा अहवाल देण्यात आला. मात्र घटनास्थळावरुन गेल्यानंतर काम सुरु ठेवण्याबाबत कोणतीही माहिती नाही. लवकरच त्याबाबत माहिती घेऊन कळविण्यात येईल.
– सुदर्शन सावंत, तलाठी